शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

वनस्पती लोण्यावर शासनाचे नियंत्रण असावे

खाद्यपदार्थ तयार करणार्‍या विविध हॉटेल-रेस्टॉरंट व अन्य ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेते वनस्पती लोण्याचा (मार्गारिन) खाद्य पदार्थासाठी अधिक वापर करीत आहेत. यामुळे दुधापासून बनविण्यात येणार्‍या लोण्याच्या विक्रीवर त्याचा विपरित परिणाम होत असून शेतकर्‍याचे दूध संकलन वाढून दुधापासून बनविण्यात येणार्‍या लोण्याचा वापर अधिक वाढावा. यासाठी वनस्पती लोण्यावर शासनाचे नियंत्रण असण्याची गरज आहे. केंद्र सरकारने 'फूड सेफ्टी अँण्ड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया'(एफएसएसएआय) या शासकीय संस्थेला या संदर्भात आदेश द्यायला हवेत. दुधापासून मिळणारे लोणी आरोग्यास लाभकारक आहे, तर वनस्पतीपासून बनविण्यात येणार्‍या लोण्यात आरोग्यास पोषक तत्त्वे नसतात. देशात १५0 कंपन्या विविध ठिकाणी वनस्पती लोणी तयार करीत आहेत. वनस्पती लोण्याच्या वापरामुळे अनावश्यक कोलेस्ट्रॉल वाढून हृदयासंबंधी विकार बळावण्याची शक्यता असते. साहजिकच त्यामुळे शेतकर्‍याचे दूध संकलन कमी होत आहे. दुधाच्या लोणीपेक्षा वनस्पती लोणी स्वस्त पडत असल्याने ग्राहकही त्याचाच वापर अधिक प्रमाणात करताना दिसत आहे. शेतकर्‍याचे दूध संकलन वाढून आरोग्यास लाभकारक दुधापासून तयार करण्यात येत असलेल्या लोण्याची विक्री वाढण्याची गरज आहे. बेकरी आणि वनस्पती लोणी (मार्गारिन) तयार करणार्‍या कंपन्यांना लोण्यामध्ये ५ टक्केपेक्षा अधिक वनस्पती लोणी वापर न करण्यासाठी मयार्दा टाकण्यात आल्या आहेत, मात्र तसे होताना दिसत नाही.  एफएसएसआयएच्या २0११ च्या कायद्यानुसार मार्गारिनपासून जे पदार्थ तयार करण्यात येतील त्या सर्व उत्पादनांवर लेबल व पॅकिंगवर 'ट्रान्सफॅट'चे प्रमाणाची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून अलीकडेच (मार्गारिनसाठी) 'डेअर अँनालॉग'ची व्याख्या स्पष्ट करण्यात आली असून यात संबंधित उत्पादनांचे नावासोबत तयार करण्यात आलेले उत्पादन मार्गारिनपासून बनविण्यात आले काय याचा उल्लेख संबंधित कंपनीला करावा लागणार आहे.त्या पदार्थांसाठी वेगळा लोगो देण्यात येणार आहे.
मार्गारिनपासून तयार करण्यात आलेले पदार्थ व त्या उत्पादनाच्या लेबलवर 'हे डेअरी उत्पादन नाही'असे ठळक अक्षरात नमूद करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचेही एफएसएसआयएने म्हटले आहे. तसेच मार्गारिन वापरून तयार करण्यात आलेल्या पदार्थांसाठी वेगळा 'लोगो'देण्यात येईल. भेसळ टाळणे व ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून लेबलवर नाव टाकण्यात यावे. दुधापासून तयार करण्यात आलेले लोणी वापरून संबंधित पदार्थ बनविला तर शेतकर्‍याचे दूध अधिक विक्री होईल, हा उद्देश ठेवून २0११ च्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. या संदर्भात अधिक जनजागृती करण्यात येईल, असेही एफएसएसआयएने म्हटले आहे,पण ही प्रक्रिया वेगाने होण्याची गरज आहे. सध्या दुधाचे उत्पादन वाढले आहे आणि त्याचा खप कमी झाला आहे. साहजिकच दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने दुध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधापासून अधिक पदार्थ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतानाच आरोग्यपूर्ण असलेल्या दुधाच्या पदार्थांचे अधिक सेवन करण्याबाबत जनमानसांत जनजागृती करण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा