सोमवार, ६ जुलै, २०२०

उद्योगाच्या विकेंद्रीकरणाची गरज

पुणे आणि मुंबईसारख्या शहरात वाढलेल्या कोरोना संसर्गाच्या रुग्णांमुळे आपल्याला फार मोठा धडा मिळाला आहे. कोरोनासारखी संकटे वारंवार येणार आहेत. गेल्या पाच-दहा वर्षांत बर्ड फ्ल्यू, सॉर्ससारख्या सहा आजारांचे संसर्ग येऊन गेले. आणि यांचे रुग्ण शहरातच अधिक प्रमाणात आढळून आले. संसर्ग हा एकमेकांच्या संपर्कामुळे होतो. जिथे गर्दी कमी तिथे संसर्ग कमी होत असल्याने आता शहरांची गर्दी कमी करण्याची गरज आहे. यासाठी जे रोजगार देणारे उद्योग ,व्यवसाय आहेत, ते आता मोठ्या शहरांपेक्षा लहान शहारांमध्ये स्थलांतरित केले पाहिजेत. नवीन उद्योग सुरू करतानासुद्धा देशातील मोठय़ा महानगरांचीच निवड केली जात आहे.
त्यामुळे देशातल्या एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के लोकसंख्या ही मोठ्या शहरांमध्ये आढळून येत आहे. जीवन सुखी, आरोग्यमय जगण्यासाठी आता उद्योगधंदे लहान शहरांकडे हलवले पाहिजेत किंवा नवीन उद्योगांची सुरुवातदेखील इथेच व्हायला हवी. शेतीसंबंधीचे प्रक्रिया उद्योग वास्तविक खेड्यातच उभे राहण्याची गरज आहे. सरकारने अशा उद्योगांना ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही बाब आता प्रकर्षाने समोर येत असून उद्योजकांनी केवळ नफाच न पाहता आपले नवीन उद्योग आता आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लहान शहरांमध्ये सुरू करायला हवेत. म्हणजेच आता उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे. इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरची देशात मोठय़ा प्रमाणात आयात केली जाते. उच्च तंत्रज्ञान, कौशल्य असलेले मनुष्यबळ आपल्या देशात उपलब्ध असताना या क्षेत्राची आयात कमी होऊन निर्यात वाढली पाहिजे.  परकीय गुंतवणूक आल्याशिवाय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही. उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले तर रोजगार निर्मिती होईल व आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या भागाचा विकास होईल. हाच आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग आहे. इलेक्ट्रानिक हार्डवेअर ऑफ इंडियाने लोकांची गरज लक्षात घेऊन आपली उत्पादने तयार करावी. उच्च तंत्रज्ञानाचा व कौशल्याचा वापर करून ही उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जाची, नवीन आकर्षक डिझाईनची तयार झाली, तर त्याची निर्यात शक्य होईल. आज आपल्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत. ही आव्हाने कमी करण्यासाठी निर्यातीची गरज आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे सरकारनेही आज ज्या उद्योगांची आवश्यकता आहे, त्यांना पाठबळ द्यायला हवे. अँपसारख्या गोष्टींनादेखील मदत मिळाली पाहिजे. या क्षेत्रात रोजगाराच्या खूप संधी आहेत. त्यांना फक्त वाट करून देण्याचे काम सरकारने करायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा