सोमवार, २९ जून, २०२०

पेट्रोल-डिझेल 'जीएसटी'च्या कक्षेत आणा


सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर फारच खाली आले आहेत. असे असताना याचा फायदा जनतेला व्हायला हवा,पण त्याचा फायदा तर सोडाच पण या अतिरिक्त कर रूपाने गोळा केलेल्या पैशाचे काय केले, हेसुद्धा कळायला मार्ग नाही. मात्र यामुळे महागाई सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. कोरोनाने जगणं अवघड झाले असताना महागाईने कंबरडे मोडून टाकले आहे.  पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास त्याच्या किमती अगदी निम्म्याने कमी होतील. सगळेच राजकीय पक्ष सत्तेत बदले असल्याने आंदोलने, मोर्चे कुणी काढायचे हा प्रश्न असून आता जनतेनेच यासाठी  दोन्ही सरकारवर दबाव टाकण्याची गरज आहे.
इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या केवळ पोकळ चर्चा होत आहेत. मात्र, सरकार ठोस भूमिका घेत नाही. केंद्र आणि राज्याच्या करांमुळे इंधनाच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. इंधनासाठी वेगवेगळ्या कर आकारणीमुळे त्याची टक्केवारी मोठी होते. त्यामुळे इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या अंतर्गत आल्यास मूळ किमतीवर 28 टक्क्यांपेक्षा जास्त कर लावता येणार नाही. त्यामुळे मूळ किमत 24.62 रुपये प्रतिलिटर पेट्रोलवर 28 टक्के जीएसटी लावला, तर त्याची किमत 31.51 रुपये होते; तर डिझेल 33.33 रुपये प्रतिलिटर होईल. अगदी चाळीस रुपये प्रतिलिटरसाठी जीएसटी आकारला तर ही किमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल. शिवाय वाढत चाललेली महागाई आटोक्यात येईल. जीएसटीनुसार किंमतीची आकारणी केल्यास हे दर आताच्या किमतीच्या तुलनेत निम्मेच  येतात. गेल्या चार महिन्यांत पेट्रोल 16 रुपये; तर डिझेलवर 19 रुपयांपर्यंत वाढला आहे. याचा मोठा परिणाम महागाईवर झाला असून आधीच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने कित्येक लोकांचा रोजगार गेला आहे. काहींना निम्म्या पगारावर समाधान मानावे लागत आहे. अख्खन भारत देश आर्थिक अडचणीत असताना सरकारे मात्र त्यातूनही इंधन वाढ करून जनतेची पिळवणूक करत आहे. शिवाय यासाठी आता जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागणार आहे. करण आंदोलन कोण करणार, असा प्रश्न आहे. केंद्रात भाजप आणि त्यांच्या मित्रा पक्षांची सत्ता आहे आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आवाज उठवणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण होतो. इंधन दरवाढीविरोधात यापूर्वी  आंदोलने झाली आहेत. मात्र या वेळी कोणीच आवाज उठवायला तयार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा