शुक्रवार, १२ जून, २०२०

मंदिरातील दागिने रिझर्व्ह बँकेत ठेव ठेवा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या मंदिरांमध्ये भाविकांना देव दर्शनासाठी अटकाव करण्यात आला. साहजिकच मंदिरं ओस पडली आणि भक्तांच्या देणगीचा ओघ आटला. मंदिरांचे उत्पन्न बुडाले आणि मंदिराच्या पूजेपासून सुरक्षेपर्यंतच्या कामगारांना पगार द्यायला पैसे नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. तिरूपती बालाजी या प्रचंड उत्पन्न असलेल्या मंदिराची ही हालत असेल तर अन्य मंदिरांच्याबाबतीत काय बोलावे? असा प्रश्न उपस्थित होतो. पण देवाला अर्पण करण्यात येणाऱ्या सोन्याच्या ठेवी रिझर्व्ह बँकेत ठेवल्या असत्या तर त्या व्याजातून कर्मचाऱ्यांचे पगार निघाले असते आणि आज जी वेळ मंदिरांवर आली आहे,ती आली नसती.
भाविकांनी दिलेले दागिने कुलूपबंद ठेवण्यापेक्षा त्याचा सरकार आणि देवस्थानाला फायदा झाला असता. आपल्याकडील देवांना दागदागिने अर्पण करण्याच्या प्रमाणात अलीकडे मोठी वाढ झाली आहे. हा भक्तांच्या श्रद्धेचा प्रश्न असल्याने यावर अधिक न बोलता या मंदिरांच्या तिजोरीत जमा झालेल्या दागिन्यांचे मूल्यांकन करून ते सरकारी तिजोरीत ठेवल्यास त्यावरील व्याज देवस्थानाच्या उपयोगात येईल. अनेक मंदिरांनी हॉस्पिटल, शिक्षण संस्था देवस्थानच्या माध्यमातून उभ्या केल्या आहेत आणि त्या यशस्वीरीत्या चालवल्याही जात आहेत,मात्र अशा मंदिरांकडे मोठ्या प्रमाणात सोने पडून आहे. तो अशा प्रकारे उपयोगात आणल्यास सरकार आणि देवस्थान या दोघांनाही फायदा होणार आहे.
भाविक सोने देवाला अर्पण करून मोकळे होतो, त्याला आपण दिलेल्या सोन्याचे काय झाले याची काही कल्पना नसते. मात्र बऱ्याच ठिकाणी असे सोन्याचे दागिने नोंदवले जात नाहीत. काही ठिकाणी हे दागिने पुजाऱ्याकडून हडप केल्याचा तसेच त्या जागी नकली दागिने आणून ठेवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे सर्व टाळण्यासाठी भाविकांकडून आलेल्या दागिन्यांचे मान्यताप्राप्त मूल्यांकनकारांकडून मूल्यांकन करण्यात यावे आणि ते दागिने वितळवून बिस्कीटरुपात रिझर्व्ह बँकेकडे जमा करायला हवे. मंदिरांकडे दुर्मिळ प्राचीन  दागिने आहेत. त्यांचे मूल्यांकन करणे अवघड आहे. मूर्तीवरील व तिजोरीतील प्राचीन दागिन्यांना हात न लावता अलीकडच्या काळात भाविकांकडून आलेल्या दागिन्यांचा यासाठी उपयोग करता येईल. भाविकांकडून आलेले दागिने देवाच्या पायाशी ठेवल्यानंतर वर्षानुवर्षे तिजोरीतच राहतात. ते रिझर्व्ह बँकेकडे ठेवल्याने दोन-अडीच टक्के व्याज मिळेल. यातून मंदिराच्या कर्मचाऱ्यांचे पगार निघतील. यामुळे देशाचाही फायदा होईल. देशाकडे सोने उपलब्ध होईल. तस्करी मार्गाने सोने भारतात येते,त्याला आळा बसू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा