गुरुवार, ११ जून, २०२०

क्रिकेटला नवसंजीवनी

क्रिकेटच्या माहेरघरात म्हणजे इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात पाच दिवसांच्या कसोटी मालिकेला लवकरच प्रारंभ होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खेळासह सर्वच व्यवस्था लॉकडाऊन झाल्याने याचा मोठा फटका क्रिकेट संघ आणि त्यांच्या मंडळांना बसला आहे. वेस्ट इंडिजचे क्रिकेट विश्व तर फारच आर्थिक गोत्यात सापडले आहे. त्यामुळे तिथे खेळांडूच्या मानधनात 50 टक्के कपात करण्यात आली होती. पाकिस्तानच्या क्रिकेटविश्वाचीदेखील यापेक्षा वेगळी अवस्था नाही. जवळपास सगळयाच संघांना क्रिकेट सुरू होण्याची अपेक्षा आहे. पण यात अडचणी बऱ्याच असताना प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेचे काय किंवा चेंडूच्या लकाकीसाठी गोलंदाजांकडून लावण्यात येणाऱ्या लाळेचे काय या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार करून शेवटी कसोटी सामान्यांतून क्रिकेटचे पुनरागमन होत आहे.
काही नियम करण्यात आले असून त्याच्या साथीने आता क्रिकेट खेळले जाणार आहे. क्रिकेट खेळवण्याची घाई अर्थात अर्थकारण हेच आहे, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण सोन्याची अंडे देणारी ही कोंबडी जिवंत राहावी, याची चिंता सगळ्यांच आहे. वास्तविक क्रिकेटचे अर्थकारण हे अन्य कोणत्याही खेळापेक्षा खूपच वेगळे आहे. इथे मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या तिकिटातून जमणाऱ्या पैशांपैशा अधिक पैसा हा प्रेक्षपणाच्या हक्कातून मिळतो. त्यामुळे संयोजकांना त्याच्यात फार रस असतो. घरबसल्या प्रेक्षकांना या खेळाची मजा लुटता येते आणि संयोजकांना  टीव्हीच्या माध्यमातून मिळणाऱ्या वारेमाप जाहिरातींचा फायदा होतो. त्यामुळे क्रिकेट कमालीचे श्रीमंत झाले आहे. ही श्रीमंती टिकवण्याचा हा अट्टाहास चालला आहे. यात काही चुकीचे नाही. कोरोनावर इलाज नाही,तोपर्यंत सगळ्यांनाच त्याच्यासोबत जगावे लागणार आहे. नाहीतर आर्थिक फटका सगळ्यांनाच उदवस्त करू शकतो. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेच्या माध्यमातून त्याला सुरुवात होत आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी खेळाने कसोटी खेळावर अरिष्ट आणले आहे, पण संयोजकांना खात्री असावी की कसोटी खेळाचा आनंद प्रेक्षक घरात बसून घेतील. पण काही का असेना तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर खेळाला सुरुवात होते, हेच महत्त्वाचे आहे. शेवटी जगण्याची धडपड सगळ्यांना करावीच लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा