मंगळवार, ९ जून, २०२०

सलून व्यावसायिकांना मदतीची गरज

लॉकडाऊनमुळे सलून चालक, मालक आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी, त्यांना परत घरोघरी जाऊन दाढी-कटिंग करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यातपण मोठय़ा अडचणीचा त्यांना सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक त्यांना घरात आणि दारात घ्यायला धजावत आहेत. कधी नव्हे ते सुद्धा नागरिक आता घरीच दाढी-कटिंग करू लागले आहे.  याचा परिणाम सलून व्यवसायावर मोठा होताना दिसत आहे. बहुतेक सलून व्यावसायिकांचे दुकान भाड्याचे असून, गेल्या तीन महिन्यांपासून हाताला कामच नसल्याने भाडे कसे द्यायचे, घरी खाण्यापिण्याची व्यवस्था, मुलांबाळांचे शिक्षण आदी समस्या कशा सोडवायच्या या विवंचनेत सलून व्यावसायिक सापडला असल्याने शासनाकडून आर्थिक मदतीची प्रतीक्षा करीत आहे.
आम्हालाही सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपये जमा करावेत, तसेच सलून व्यावसायिकांना ५0 लाखांचे विमाँ संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. शासनाने मदत न दिल्यास यापुढे कोणीही कोणाच्याही घरी जाऊन कोणत्याही नेत्याची, पुढार्‍याची, अधिकार्‍याची कटिंग, दाढी करणार नाही, असा संघटनांनी निर्णय घेतला आहे. सलून चालू करण्यास परवानगी न मिळाल्यास लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. उदरनिर्वाहसाठी पारंपरिक नाभिक व्यवसायाशिवाय त्यांच्याकडे इतर साधन नाही. ९0 टक्के लोकांकडे शेती नाही, दुकानेही भाडेपट्टय़ाने घेतली आहेत. त्यामुळे भाडे, वीजबील, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर उधार उसनवारी आदी खर्च कसा करायचा? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना आटोक्यात आल्याशिवाय सलून व्यावसायिकांना चांगले दिवस येणार नाही. तोपर्यंत शासनानेच त्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा