शनिवार, २७ जून, २०२०

सापाला मारू नका; काळजी घ्या


पावसाळा हा सापांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे या दिवसांत सुरक्षित जागा शोधण्यासाठी ते बाहेर पडतात. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याने बिळे बुजतात. परिणामी त्यांच्या अधिवासावर होणारे हे आक्रमण त्यांना सहन न होणारे असते. त्यामुळे मानवी वस्तीच्या आसपास सर्पदंशाच्या घटना या दिवसांत वाढतात. भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेले साप आपसूकच माणसांकडून मारले जातात. लोक घाबरून सापाला मारतात. खरे तर नागरिकांनी साप दिसल्यास घाबरून न जाता आपत्कालीन परिस्थितीची शास्त्रीय माहिती घेण्याची गरज आहे.
आपल्याजवळ मोबाईलमध्ये किंवा डायरीमध्ये स्थानिक सर्पमित्र किंवा त्यातील जाणकार यांचे फोन नंबर नोंदवून ठेवावेत. त्यांच्याशी किंवा वन विभागाशी संपर्क साधावा. काही ठिकाणी गारुडी समाज आहे, त्यांच्याशी संपर्क साधावा. तोपर्यंत त्याच्या हलचालीकडे लक्ष ठेवावे. त्याला पकडण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करू नये. लहान मुले,पाळीव प्राण्यांना त्यांच्यापासून दूर ठेवा. मुळात आपल्या घराजवळ साप आढळून येऊ नयेत,यासाठी पालापाचोळा,कचरा,दगड-विटा,लाकडे रचून ठेवू नयेत. घराच्या भिंतीला,कुंपणाला पडलेली भगदाडे, बिळे बुजवून घ्यावीत. घराच्या दार-खिडक्यांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या वेळोवेळी तोडाव्यात. गवतातून चालताना पायात बूट घालावेत.रात्री बाहेर पडताना हातात बॅटरी असावी. रात्री बाहेर झोपू नये. साप उंदीर वगैरे खात असल्याने नैसर्गिक समतोल साधला जातो. त्यामुळे त्याची हत्या करू नये. वास्तविक आपल्या देशात 52 प्रकारच्या सापांपैकी नाग,मण्यार, घोणस, फुरसे या चार जातीच विषारी आहेत. बाकीचे बिनविषारी अथवा निमविषारी आहेत. या सापांपासून मानवाला धोका नाही. मात्र काळजी घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा