बुधवार, १० जून, २०२०

मास्क, स्वच्छता व शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करा

देश,राज्ये आर्थिक संकटात सापडली आहेत. सर्व आर्थिक  व्यवहार सुरळीत सुरू होण्याची गरज आहे. तसे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सगळ्यात जास्त जबाबदारी आता आपल्या स्वतःवर आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर,स्वच्छता, मास्क या त्रिसूत्रीचा वापर करून आपण कोरोनासोबत जगले पाहिजे. यात आता सरकारला दोष देऊन चालणार नाही. आणखी काळ लॉकडाऊन केले तर देशाची आर्थिक चक्रे थांबतीलच, शिवाय अनेकांना (उद्योग-व्यवसाय अभावी) उपाशी मरावे लागेल. त्यामुळे शारीरिक अंतर ठेवून सुरक्षित वावरच कोरोनाचा फैलाव रोखू शकणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक घटकाने सावध राहण्याची गरज आहे. आता शाळा, चित्रपटगृह आदी गोष्टी सोडल्या तर सगळ्या गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.
अगदी नागरिकांना उद्यानांमध्ये फिरण्यासही परवानगी देण्यात आली आहे.वाढत्या गर्दीमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणार नाही, याची काळजी सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याची जबाबदारी  आता सरकारची आणि आरोग्य यंत्रणेची नाही तर आपली आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मूठभर उपद्रवी लोकांमुळे संकटाचे गांभीर्य वाढत असल्याचे म्हटले जात होते. त्यावेळी संबंधितांना नावे ठेवणारी मंडळी आता खुलेआम नियमभंग करताना दिसत आहेत. आरोग्य नीट राखण्यासाठी मोकळ्या हवेत फिरण्याची आवश्यकता असली, तरी ते स्वत:सह इतरांना धोका निर्माण करू शकतात, याची जाणीवही ठेवायला हवी. विशिष्ट शारीरिक अंतर ठेवून फिरण्याची काळजी प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे भान ठेवले जाताना दिसत नाही.आता परिस्थिती अधिक बिघडली आहे. हे वास्तव समजून न घेता आपण व्यवहार करणार असू, तर आपल्यासाठी कोणतीही यंत्रणा पुरी पडू शकणार नाही. कोरोनावर लस उपलब्ध होण्यासाठी एक वर्ष लागेल, की दोन वर्षे लागतील याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनच्या पलीकडे जाऊन, कोरोनासह जगण्याची सवय करावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मास्क, स्वच्छता आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीच्या आधारे पुढील वाटचाल करावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा