शुक्रवार, १२ जून, २०२०

नागरिकांनी स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे.

नागरिकांकडून शिस्तीचे पालन होत नसल्याचे दिसून आले. यामुळे कोरोनाचा मोठय़ा प्रमाणात प्रसार होण्याची भीती वाढली असल्याने पुन्हा कठोर लॉकडाऊन लागू केले जाईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिला, हे योग्यच झाले. टाळेबंदी सुनियोजितरीत्या हटविणे, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे व वारंवार हात धुणे बंधनकारक करणे, त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, मनोरजंनाचे कार्यक्रम आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरील, तसेच धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवरील बंदी कायम ठेवणे, मोठय़ा प्रमाणात लोक जमणार्‍या विवाह सोहळ्यांवरील बंदी कायम ठेवणे, आदी मार्गांचा अवलंब केल्यास, देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणे आणि कोविड-१९ आजारावर मात करणे, हे दोन्ही उद्देश साध्य होऊ शकतात.
सावधगिरीसह हर्ड इम्युनिटी हाच सुयोग्य पर्याय दिसतो.शहरी भागातील घनदाट वस्तीत-जिथे सार्वजनिक सोयी-सुविधा वापरल्या जातात तेथे संसर्ग वाढत आहे. या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, त्वरित चाचण्या आणि अलगीकरण, तसेच रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि प्रतिबंधक धोरण या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. बफर झोनमध्ये निरीक्षण आणि कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी पाळायचे नियम आणि सवयींची माहिती जनतेला वारंवार दिली जात आहे, तरीही देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.यात लोकांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. भारतात ८0 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांत आहेत. संसर्गाच्या बाबतीत आता भारत जगभरातल्या सर्वात जास्त रुग्ण असणार्‍या पहिल्या दहा देशांच्या यादीत आहे. तर नवीन रुग्णांच्या संख्येच्याबाबत भारत पहिल्या पाच देशांमध्ये आहे. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा दर जगाच्या तुलनेत भारतात कमी आहे. अर्धेअधिक रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत, हा दिलासा आहे तर रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा