शुक्रवार, २६ जून, २०२०

इंधन दरवाढ म्हणजे सरकारचे अपयश

सध्या इंधनाचे दर भयानक वाढले आहेत. यात कोरोनाच्या नावावर आणखी दर लादण्यात आला. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर फारच खाली आले आहेत. असे असताना याचा फायदा जनतेला व्हायला हवा,पण त्याचा फायदा तर सोडाच पण या अतिरिक्त कर रूपाने गोळा केलेल्या पैशाचे काय केले, हेसुद्धा कळायला मार्ग नाही. मात्र यामुळे महागाई सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. कोरोनाने जगणं अवघड झाले असताना महागाईने कंबरडे मोडून टाकले आहे. वास्तविक 2014 मध्ये इंधन सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यात आले. त्यानंतर डिझेलचे दर सतत वाढतच आहेत. यावर्षी आधी अंदाजपत्रकात केंद्र सरकारने इंधन महाग केले. नंतर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे पुन्हा इंधनांवर कर लादून त्याचे दर वाढवण्यात आले. केंद्राचा कित्ता बहुतेक सर्व राज्यांनी गिरवला त्यामुळे भारतात सर्वत्र इंधन महागले आहे.
देशात आता आर्थिक व्यवहार पूर्णपणे सुरु व्हायला लागले आहेत आणि इंधन वाढीचे खरे परिणाम दिसू लागले आहेत. वाहन उद्योगावर तो विशेष जाणवत आहे. इंधन महाग करून पैसा जमा करणे हे एका परीने सरकारांचे अपयश आहे. यातून नेमका किती निधी जमला व त्याचा विनियोग कसा केला हे जनतेस कळत नाही. गेली दोन-तीन वर्षे केंद्राचे उत्पन्न घटत आहे याला कारण मोदी सरकारने अर्थव्यवस्थेची हाताळणी अयोग्य पद्धतीने केली हे आहे. कोरानाची साथ मार्चमध्ये देशात उद्भवली. त्यामुळे देशभर टाळेबंदी लागू केली गेली. लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु असताना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्राने इंधनावरील उत्पादन शुल्क वाढवले. त्यातून केंद्राला 1 लाख 60 हजार कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. लॉकडाउनच्या आधी मार्चमध्येही इंधनावरील उत्पादन शुल्क वाढवले होते. त्यातून 39 हजार कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. अंदाजपत्रकाबाहेर केलेल्या या दुसर्‍या करवाढीचे समर्थन करण्यासाठी विकास हा मुद्दा वापरला गेला. या करातून जमा होणार्‍या पैशातून रस्ते व अन्य मूलभूत सुविधा(इन्फ्रास्ट्रक्चर) उभे करण्यात येईल असे सरकारने सांगितले होते. सध्या खनिज तेलाचे जागतिक दर 40 डॉलर प्रति पिंपाच्या आसपास आहेत. आंतरराष्ट्रीय किंमतींनुसार हे दर असल्याचे तेल कंपन्या सांगत आहेत पण खनिज तेलाचे दर कमी होत असताना भारतात ही दरवाढ का होत आहे ते कळत नाही. रेल्वे, बस, राज्य परिवहन यांत डिझेलचा वापर होतो. शेतकरीही डिझेल वापरतात.आपल्याला शेतकर्‍यांचा कळवळा असल्याचे मोदी सरकार म्हणते; पण त्यांच्या माथी महाग डिझेल मारून त्यांचे कोणते कल्याण साधले जाते, हे कळत नाही.इंधन महागले की वाहतूक महागते व सर्वसाधारण महागाई वाढते. आताच अन्नधान्य व खाद्य पदार्थांच्या महागाई वाढीचा दर 9.28 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात अजून वाढ होण्याचा धोका दाट आहे. कोरानाच्या साथीत उत्पन्न गमावलेल्या सामान्य नागरिकांना इंधनाची ही दरवाढ कंबरडे मोडत आहे. मायबाप सरकार नेमके कशासाठी आहे, हेच समजत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा