शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

मलेरियावरही लस येण्याची गरज

कोरोनाचा संसर्ग जगभरात वाढत असताना त्याच्यावर लस निर्मिती करण्याचेही काम जोरात सुरू आहे. रशियाने यात बाजी मारली आहे. ऑक्सफर्ड चीही लस अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात कोरोनवरची लस बाजारात उपलब्ध होऊ शकेल. मात्र या कोरोनाच्याही आधी कितीतरी वर्षे भारतात आणि जगभरात थळ ठोकून असलेल्या मलेरियावर अजून लस आलेली नाही. शिवाय त्यावर औषध उपचारही उपलब्ध नाही. भारतात वर्षभरात जवळपास मलेरियाचे ८.४ लाख रुग्ण आढळतात. आणि यातील जवळपास २० टक्के रुग्ण दगावतात. असे असताना या गंभीर रोगाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. जागतिक मलेरियाचा विचार केला तर भारतामध्ये सुमारे ४ टक्के रुग्ण आहेत. परंतु दक्षिणपूर्व आशियात ८७ टक्के रुग्ण हे भारतातील आहेत. ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये देशातील ७४ टक्के रुग्ण आढळतात. देशातील ९४ टक्के लोकांमध्ये मलेरिया होण्याचा धोका आहे, असे  तज्ज्ञांचं म्हणणं आहे. २0३0 पर्यंत भारताने मलेरिया निर्मूलनासाठी एक योजना तयार केली आहे. मलेरियाचे जलद निदान आणि उपचार करणे, पाळत ठेवण्याची प्रक्रिया मजबूत करणे आणि निर्मूलनाकडे प्रवेग करणे अशा या प्रणालीचे तीन खांब आहेत. भारतात अनेक आकर्षक पर्यटन स्थळे आणि जागतिक वारसा स्थळे आहेत. डासांमुळे होणार्‍या मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया आणि साथीच्या पोटाच्या रोगांसारख्या आजाराची चिंता भारतात येणार्‍या विदेशी पर्यटकाना असते. त्यामुळे मलेरिया निर्मूलन करण्याची गरज आहे. यासाठी भारताने योजना आखली आहे. भारतात मलेरिया निर्मूलनाची ही सुरुवात आहे. 'मलेरियामुक्त भारत' हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी या आजारावर अधिक संशोधन होऊन लस उपलब्ध होण्याची गरज आहे. शिवाय उपचारपद्धतीही यायला हवी.
मलेरिया हा एक प्रतिबंधात्मक आणि बरा होणारा आजार आहे. तथापि जगात दरवर्षी मलेरियामुळे साडे चार लाख मृत्यू होतात, आणि त्यापैकी ९५ टक्के ब्रेन मलेरियामुळे होतात असे ऑस्ट्रियाचे मलेरीया तज्ञ डॉ. प्रा. एरीच स्मुझार्ड यांनी सांगितले आहे.सब सहारान आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया आणि लॅटिन अमेरिकेत मलेरियाचे प्रमाण जास्त आहे. हा रोग मादी अनोफेलिस डासांद्वारे पसरतो. मलेरियामुक्त भागातील पर्यटकांना सेरेब्रल मलेरिया होण्याची जास्त शक्यता आहे.  जगभरात २0१८ मध्ये मलेरियाच्या २२.८ कोटी रुग्णांची नोंद झाली आहे. मलेरिया आजाराचा ब्रेन मलेरिया हा एक प्रकार आहे. हा प्लाझमोडियम फाल्सीपेरम प्रजातीमुळे होतो. ताप, बेशुद्धावस्था आणि मिरगीचे झटके ही मुख्य लक्षणे आहेत. मलेरिया परजीवी संक्रमित रक्त पेशी मेंदूतील लहान रक्तवाहिन्या मध्ये फसतात आणि मेंदूला सूज येते. हा रोग अतिशय गंभीर आहे आणि केवळ मेंदूवरच परिणाम करत नाही तर मूत्रपिंड, यकृत आणि शरीरातील प्रत्येक अवयवावर देखील परिणाम होतो. ब्रेन मलेरिया ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. निदान आणि उपचारांना उशीर झाल्यास २0 टक्के रुग्णांचा बळी जातो. परंतु जर अतिदक्षता विभागात रुग्णांवर योग्य उपचार केले गेले तर मृत्यूचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत खाली येते. बहुतेक मृत्यू, मुले आणि गर्भवती महिलांमध्ये असतात. लस तयार करण्याचे प्रयत्न अद्यापपर्यंत यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे आता मलेरिया आजारावरदेखील लस येण्याच्या दृष्टीने संशोधन व्हायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा