शुक्रवार, २४ जुलै, २०२०

देशाने 'फिनिक्स' झेप घेण्यासाठी...!

कोरोना विषाणूचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत. अनेक समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत. अर्थव्यवस्था संकटात आली असतानाच अशा स्थितीत कोरोनाच्या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याची गरज आहे. १९४७ पूर्वी आणि नंतर आपल्या देशातील जनतेने अनेक समस्यांचा आणि संकटांचा सामना केला आहे. त्या सर्व संकटांवर मात करून आपण उभे राहिलो आहे. आज कोरोनामुळे समाजात नैराश्य, नकारात्मकता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण समाजात आत्मविश्‍वास प्रस्थापित करावा लागेल. यासाठी सत्ताधारी मंडळींनी राजकारण न करता वस्तुस्थिती देशासमोर मांडली पाहिजे. लोकांची दिशाभूल केल्यास याचे नुकसान देशालाच भोगावे लागणार आहेत. सत्ताधारी, विरोधक आणि उद्योजक यांनी देशाला आश्वस्त करण्याची गरज आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटावरही आपण आत्मविश्‍वास व सकारात्मकतेने मात करू शकू. आर्थिक युध्दाचा सामना करीत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 'आत्मनिर्भर भारत' च्या दिशेने देशाची वाटचाल होण्यासाठी प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा आहे. निव्वळ घोषणांनी काही होणार नाही. आज देशातील तरुण वर्गाला तांत्रिक आणि व्यासायिक शिक्षण देण्याची गरज आहे. देशातील ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य, संशोधन, नाविन्य, यशस्वी प्रयोग हे प्रकारचे ज्ञान असून या ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची गरज आहे. देशात जे विकलं जातं, त्याची निर्मिती होण्याची गरज आहे. बाहेरून आयात होणाऱ्या मालावर त्यामुळे निर्बंध बसणार आहे. यासाठी उद्योजक, युवक यांना शासनाची साथ हवी आहे. तरच भारत 'फिनिक्स'झेप घेणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि खर्चात बचत, तसेच अधिक निर्यात देशाच्या अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात आपण पक्के उभे राहू शकणार नाही. भारताने आधुनिकीकरण स्वीकारले आहे. पण पाश्‍चातीकरणाच्या आपण विरोध व्हायला हवा.अद्ययावत तंत्रज्ञान, विज्ञान, कौशल्य, अधिक निर्यात, नवीन संशोधन, उद्योजकता, यशस्वी प्रयोग या मागार्ने आपण पुढे गेलो तर देश सुखी, समृध्द, संपन्न, शक्तिशाली होऊ शकेल.सुपर इकॉनॉमिक पॉवर हे आपले स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य दृष्टिकोनातून विकास व्हावा आणि हाच आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे देशातील ६0 टक्के लोकसंख्या आज ग्रामीण भागात वास्तव्य करीत आहेत. ही लोकसंख्या आज गरिबीशी संघर्ष करीत आहेत. यासोबतच या जनतेसमोर रोजगाराची मोठी समस्याही निर्माण झाली आहे. या दोन्ही समस्या सोडविण्यासाठी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी या भागात नवीन उद्योगांचे जाळे आणि पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. त्यामुळे या क्षेत्राचा जीडीपी वाढेल आणि आर्थिक व सामाजिक समता निर्माण होईल. ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या वस्तूंवर आधारित उद्योग निर्मिती झाली पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा