शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

शाश्‍वत वाहतुकीसाठी ई-व्हेईकल गरजेचे

देशातील सार्वजनिक जलद वाहतुकीसाठी 'इलेक्ट्रिक व्हेईकल' आणि जैविक इंधन ही आज देशाची गरज आहे. या उपायामुळेच क्रूड ऑईल आयात खरेदीसाठी देशावर येणारा आर्थिक भार कमी होईल व सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देश स्वयंपूर्ण होईल. वाहतुकीसाठी लागणार्‍या इंधनापैकी आज 70 टक्के क्रूड ऑईल आयात करावे लागते. त्यामुळे निर्माण होणार्‍या कार्बन डायऑक्साईचे प्रमाणही वाढते. 18 टक्के कॉर्बन डायऑक्साईड राष्ट्रीय महामार्गांवर चालणार्‍या वाहनांमुळे निर्माण होतो. जैविक इंधन किंवा इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर झाला नाही, तर हे प्रमाणात भविष्यात  आणखी वाढत जाणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकवर चालणारी प्रवासी वाहने ही इंधनासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी, प्रदूषण न करणारी शाश्‍वत वाहतूक प्रदान करणारी आहेत. त्याचबरोबर ब्रॉड गेज मेट्रोची संकल्पना  देशातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये राबविण्याची गरज आहे.  एक्सप्रेस रेल्वे 60 किमी प्रतितास वेगाने धावते, पॅसेंजर 40 किमी प्रतितास वेगाने धावते, तर ब्रॉडगेज मेट्रो 120 किमी प्रतितास वेगाने धावतील. नवीन तंत्रज्ञानाने यात आणखी वाढ शक्य आहे. पॅसेंजर आणि एक्सप्रेससाठी ब्रॉडगेज मेट्रो हा योग्य पर्याय होऊ शकतो. महानगरांमधील सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक बसेस किंवा सीएनजी, एलएनजी इंधनाचा वापर व्हायला हवा. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना टॅक्सीची परवानगी मिळाली तर ग्रामीण भागात एका व्यक्तीला प्रवासासाठी दुचाकीचा उपयोग होऊ शकतो. यामुळे एका व्यक्तीसाठी ट्रॅक्सीसारखे मोठे वाहन वापरण्याची गरज नाही. तसेच दुचाकीला परवानगी मिळाली तर रोजगार निर्मितीही मोठय़ा प्रमाणात होईल. इलेक्ट्रिक वाहने आपल्या घरीच चार्ज करण्याची व्यवस्थाही होईल. अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापुढे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि शाश्‍वत वाहतूक प्रदान करणार्‍या ई-व्हेईकलच देशात अधिक वापराव्या लागतील. मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, बंगलोर-चेन्नई, दिल्ली-जयपूर अशा वाहतुकीसाठी डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा वापर व्हावा. यामुळे इंधनाच्या खर्चात प्रचंड बचत होईल आणि ही प्रदूषणमुक्त वाहतूक असेल. लंडनमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी जे मॉडेल वापरले जाते, ते मॉडेल आपल्या देशातही वापरण्याची गरज आहे. आज देशात विविध प्रकारांनी जैविक इंधन बनविण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. जैविक इंधननिर्मितीसाठी लागणारा कच्चा मालही उपलब्ध आहे, त्याचा वापर झाला पाहिजे. देशाने आता आधुनिकतेची कास धरायला हवी. नवे तंत्रज्ञान पारंपरिक साधनांपेक्षा स्वस्तात आणि किफायतशीर ठरणार आहे. यामुळे रोजगारात वाढ होऊन युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा