रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

सर्वांगीण विकास हाच आत्मनिर्भरतेचा मार्ग


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या टाळेबंदीने देशाचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र यामुळे आपल्याला अनेक गोष्टी नव्याने समजून घेता आल्या आहेत. देशाने आयात कमी करून निर्यात वाढवली पाहिजेत. शेती आणि खेडी समृद्ध केली पाहिजेत आणि देशाला लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंची निर्मिती इथेच झाली पाहिजे, अशा अनेक गोष्टींकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे. म्हणजेच देशातील अनेक क्षेत्राचा विकास करण्याची संधी आहे. तंत्रज्ञान विकसित करून विविध क्षेत्राचा विकास केला तर रोजगार निर्माण होईल. रोजगार वाढला तर निर्यात वाढेल आणि अर्थव्यवस्थेला पुढे नेता येईल, हाच आत्मनिर्भर होण्याचा मार्ग आहे, हे आता सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. आयात वस्तूंसाठी आपल्या देशात पर्याय निर्माण होऊन आयातीत वस्तू निर्यात करू शकलो पाहिजे. देशात संशोधन आणि तंत्रज्ञानात अनेक लोक पुढे जात आहेत. आपल्या देशात कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ आहे, कच्चा माल आहे, तंत्रज्ञान आहे, बाजारपेठ आहे, कमी वेतनात मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते, अशा स्थितीत उत्पादन खर्चात बचत करणे शक्य आहे. कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राचा विकास करण्यासाठी त्या क्षेत्रात काम करण्याच्या खूप संधी आहेत. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर या क्षेत्राचा विकास होऊ शकतो. यामुळेच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊ शकेल.  प्रत्येक क्षेत्राची प्रगती आणि विकास केला तर आम्ही फक्त स्वावलंबीच बनणार नाही, तर तंत्रज्ञानाचा विकास करून भारतीय अर्थव्यवस्थेला पुढे नेऊ शकतो. देशातील प्रत्येक क्षेत्राची एक क्षमता आहे, त्या क्षेत्राची क्षमता व कमतरता ओळखून आणि लोकांची आवश्यकता आणि क्रयशक्ती याचा अभ्यास करून संबंधित उद्योगात पाऊल ठेवणे योग्य ठरणार आहे. कोविडमुळे निर्माण झालेली निराशा, भय बाजूला सारून सकारात्मकतेने आणि आत्मविश्‍वासाने अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागेल. आत्मनिर्भर भारतासाठी गावांच्या, मागास भागांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. सरकारने रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्  ठेवले पाहिजे. तसेच जास्तीत उद्योग या विभागाशी कसे जोडले जातील, त्या उद्योगांना कसा फायदा मिळेल अशी धोरणे अवलंबिली पाहिजेत. यासोबतच जैविक इंधन निर्मिती ही भविष्यातील आपली गरज असेल, हे ओळखून त्यादृष्टीने पावले पडली पाहिजेत.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा