शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

सुरक्षा रक्षक उद्योगात रोजगाराची संधी

कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या स्थितीत आज देशात अधिकाधिक रोजगार निर्मितीची आवश्यकता असताना जो उद्योग मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण करीत आहे, तो उद्योग देशासाठी महत्त्वाचा आहे. कोविडदरम्यान सुरक्षा रक्षकांनी जनतेची खूप सेवा केली. कोरोनाबाधितांची सेवा केली. त्यांची ही सेवा अभिनंदनीय आहे. खूप मोठा पसारा या उद्योगाचा असून या उद्योगात विविध क्षेत्रांचा समावेश आहे. सीसीटीव्ही, फायर फायटिंग इक्विपमेंट आदींचा या सुरक्षा रक्षक उद्योग क्षेत्रात समावेश आहे. सध्याच्या काळात या क्षेत्राने मोठय़ा प्रमाणात रोजगार लोकांना उपलब्ध करून दिला आहे.  तंत्रज्ञान आता खूप पुढे गेले आहे. सुरक्षा रक्षक क्षेत्रातही बदल होत आहेत. सुरक्षा रक्षक हे क्षेत्र आता समाजाची गरज झाले आहे. एक नवीन दृष्टिकोन घेऊन या उद्योजकांना आता काम करावे लागणार आहे. येत्या 10 वर्षात हा उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी काय करावे लागेल, त्या दृष्टीने उद्योजकांनी विचार करावा लागेल. रोजगाराची खूप क्षमता या उद्योगात असून ते देशासाठी महत्त्वाचे आहे. सीसीटीव्हीसाठी लागणारे काही साहित्य आयात करावे लागते. या क्षेत्रातील काही उद्योजकांच्या म्हणण्यानुसार हे साहित्य आपण भारतात बनवू शकतो. चीनमधून आयात करण्यात येणार्‍या साहित्यावर आयात शुल्क वाढवता येईल. पण नवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे साहित्य आपल्या देशात बनविण्याचा प्रयत्न करावा लागेल. ते साहित्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे यासाठी प्रयत्न झाले तर आपण निर्यातही करू शकणार आहोत. परदेशातील अनेक व्यापारी आपल्या व्यापारासाठी नवीन स्थळाच्या शोधात आहेत. अशावेळी आपणास संधी आहे. या संधीचा उपयोग आपण केला पाहिजे. त्याचबरोबर अग्निशमनसाठी लागणाऱ्या  साहित्याचे तंत्रज्ञान विकसित व्हायला हवे आहे.  महापालिकांना लागणारे आवश्यक साहित्य उपलब्ध होऊ शकत नाही, अशा वेळी खासगी कंपन्यांकडे ते उपलब्ध असले तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. शासनाच्या अनेक योजना आहेत, या योजनांचा फायदा आपल्या उद्योग क्षेत्राने घ्यायला हवा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा