गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

खेळाकडे करिअर म्हणून पाहायला हवे

ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय संघाने 1920 मध्ये प्रथम सहभाग घेतला. त्याला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हापासून 1980 पर्यंत हॉकी संघाने आठ सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्राँझपदके मिळवून जागतिक हॉकी जगतात वर्चस्व मिळवले. या क्रीडा प्रकारात भारतीय संघाने आपला दबदबा निर्माण केला होता, मात्र त्यानंतर भारताची पीछेहाट होत राहिली. वैयक्तिक कामगिरीसाठी तर भारताला तब्बल 32 वर्षे वाट पाहावी लागली. 1952 मध्ये कुस्तीत खाशाबा जाधव यांच्या रूपाने भारताला ब्राँझ पदक मिळाले. तर 1996 मध्ये लिअँडर पेसने टेनिसमध्ये ब्राँझपदक मिळवले. म्हणजेच ऑलिंपिकमध्ये 1920 ते 2000 अशी 80 वर्षे भारत सहभागी झाला; मात्र वैयक्तिक पदके दोनच मिळाली. पण अलीकडच्या वीस-पंचवीस वर्षांमधील प्रगती त्यातल्या त्यात वाखाणण्यासारखी आहे, असे म्हणावे लागेल. 1996 मध्ये तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी भारतीय ऑलिपिक संघटनेचे अध्यक्ष बनले व त्यांनी देशातील ऑलिंपिक चळवळीला नवे परिमाण देऊन ऑलिंपिक खेळांच्या प्रसाराला वेग व दिशा दिली. देशातील नामवंत कंपन्या व उद्योगसमूहांनी किमान एक दर्जेदार खेळाडू दत्तक घेणे, परदेशातील तज्ज्ञ प्रशिक्षक आणून प्रशिक्षण देणे, परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवणे, देशात अनेक ठिकाणी क्रीडा सुविधा निर्माण करणे, स्पोर्टस मेडिसीनला प्रोत्साहन देणे तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमकतील, असे प्रयत्न करणे,यासाठी त्यांनी खरे तर याचा पाया रचला. तिथून काही प्रमाणात भारतीयांना खेळाविषयी आस्था वाटू लागली. क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचे खेळाडूंनी स्वप्ने पाहिली. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत देशात क्रीडा संस्कृती रुजू लागल्यानंतर 2000 ते 2016 या सोळा वर्षांत विविध ऑलिंपिकमध्ये आपण कुस्ती, बॉक्सिंग, नेमबाजी, बॅडमिंटन, टेनिस, वेटलिफ्टिंग या खेळांमध्ये तब्बल चौदा वैयक्तिक पदके मिळवली. त्यात एक सुवर्ण, चार रौप्य व नऊ ब्राँझपदकांचा समावेश आहे. 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये आपण सर्वाधिक वैयक्तिक सहा पदके मिळवली. ऑलिंपिकच्या पदकतक्त्यात तेव्हा भारताचे नावही नसायचे अथवा क्रम अगदी तळात असायचा. पण 124 कोटी लोकसंख्या असलेल्या या भारताची ही कामगिरीदेखील काहीच नाही. अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठण्याची गरज आहे. ही पदतालिकेची संख्या वाढायला हवी आहे. आणि ऑलिंम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धात पदके मिळवायची असतील, तर भारताला आपले क्रीडा धोरण बदलायला हवे. त्याची सुरुवात खेळाडूंच्या लहानपणापासूनच व्हायला हवी. कझाकिस्तानसारखे छोटे देशही सुवर्णपदकांची लयलूट करताना दिसतात, तेव्हा आपला देश क्रीडा क्षेत्रात किती मागे आहे, याची जाणीव होते. ऑलिंपिक पदके मिळवण्यासाठी देशात ऑलिंपिक संस्कृती जोमात वाढवली पाहिजे.  सरकारचेही आर्थिक पाठबळ भक्कम असायला हवेच, पण देशातल्या विविध कंपन्यांनी एक एक खेळ दत्तक घेऊन त्यात खेळाडू तयार करण्याचे काम हाती घ्यायला हवे. तसेच पालकांनीही ऑलिंपिकसारखे आंतरराष्ट्रीय खेळ खेळण्यास पाल्यांना प्रोत्साहित करायला हवे. खेळाकडे करिअर म्हणून पालक, विद्यार्थी आणि शासनाने पाहायला हवे. तरच खऱ्या अर्थाने भारत क्रीडा प्रकारात अग्रेसर राहील.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा