रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

उद्योजक बनून नोकरी देणारे व्हा

नवीन तंत्रज्ञान, संशोधनाचा उपयोग करून आजच्या तरुणांनी उद्योजक व्हायला हवे आहे आणि उद्योजकतेच्या माध्यमातून अनेकांना नोकरी, रोजगार देण्याचे आता स्वप्न बाळगायला हवे.  त्यामुळेच मागास भागाचा विकास आणि रोजगार निर्मिती होईल. राष्ट्र सर्वोपरी हीच आपली विचारधारा आणि मातृभूमीचा विकास हाच आपला उद्देश असला पाहिजे. सध्याच्या काळात समाजातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सुशासन आणि विकास हा आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग आहे. दरिद्रीनारायणाला केंद्रबिंदू मानून पुढे जाणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. २१ व्या शतकात ज्ञान ही शक्ती असून ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर हे देशाचे भविष्य आहे. प्रबळ इच्छाशक्ती व दुर्दम्य विश्‍वास असेल तर अशक्य काही नाही. आपल्या देशाची दोन भागात विभागणी झाली आहे.  ६५ टक्के लोक आपापल्या जिल्ह्यात राहतात तर ३५ टक्के लोक रोजगारासाठी विविध ठिकाणी स्थलांतर करतात. स्थलांतर करणारे कृषी, ग्रामीण आणि आदिवासी तसेच ११५ मागास जिल्ह्यातील आहेत. या भागाचा विकासच झाला नाही म्हणून रोजगारासाठी त्यांना स्थलांतर करावे लागते. आता या भागात विकास व्हायला हवा आहे आणि हा विकास उद्योगाच्या माध्यमातूनच होणे शक्य आहे. त्यामुळे आजच्या युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होऊन रोजगार निर्मिती करावी आणि इतरांना रोजगार द्यावा, नोकरी द्यावी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा