मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

फळे-भाजीपाला टिकवण्याच्या संशोधनाला वेग यावा

फळे-भाजीपाला हा नाशवंत माल आहे. टोमॅटो बरोबरच अनेक फळ आणि भाजीपाला यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यावर त्याला बाजारात भाव येत नाही.त्यामुळे बहुतांश वेळा भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. कित्येकदा त्याचा खर्चही निघत नाही. यामुळे शेतकऱ्याला त्याचा फटका बसतो. त्यावर्षी शेतकरी आतबट्टयात येतो. खरे तर जगभरात मागील दीड-दोन दशकांपासून अतिनील किरणांच्या वापराद्वारे टोमॅटोच नाही तर विविध फळे-भाजीपाल्याची टिकवणक्षमता वाढविण्याचे प्रयोग सुरु आहेत. काही प्रमाणात त्याला यशही मिळाले आहे. असे शेतकऱ्यांचे नुकसान कमी करणारे संशोधन आपल्याकडे मार्गी लागण्याची गरज आहे. आता विकिरण तंत्राद्वारे टोमॅटोची टिकवण क्षमता तब्बल ६० दिवस वाढविणारे संशोधन भाभा अणुसंशोधन केंद्र आणि पणन मंडळाच्या पुढाकारातून होणार आहे. याचे स्वागतच आहे. कारण हे संशोधन आणि प्रयोग यशस्वी झाले तर टोमॅटो दोन महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येणार आहेत. अर्थात एखाद्या हंगामात टोमॅटोचे भरघोस उत्पादन झाले अन् बाजारातील आवक वाढून दर कोसळले तर ते साठवून ठेवण्याचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. काही देशांनी तर 'सेल्फ लाईफ' अधिक असलेली वाणंच विकसित केली आहेत. तर काही देश

टोमॅटोची योग्य काढणी, प्रतवारी आणि शीत साठवणूकीद्वारे (डीप फ्रिजर) 20 ते 30 दिवसांपर्यंत टोमॅटो उत्तमरित्या टिकवून ठेवतात. चीनमध्ये जेव्हा

फळभाज्या अथवा इतर फळांचे भाव कमी असतात, तेव्हा शेतकरी फळांची पक्वता रोखण्यासाठी विशिष्ट संप्रेरकांचा सौम्य फवारा मारतात, जेणेकरून

बाजारात योग्य भाव येताच शेतकऱ्यांना फळांची तोडणी करणे शक्य होते. त्यासाठी सरकार सर्व प्रकारची मदत करते. तिथे शेतकऱ्यांनी उत्पादित

केलेल्या नाशवंत फळे व भाज्यांची साठवण करण्यासाठी अद्ययावत शीतगृहेदेखील आहेत. आपल्याकडे अशाप्रकारचे संशोधन झाल्यास टोमॅटो उत्पादकांबरोबर व्यापारी, निर्यातदार तसेच प्रक्रियादार अशा मूल्य साखळीतील सर्वांनाच उपयुक्त ठरेल असे आहे. महत्वाचे म्हणजे हे संशोधन प्रत्यक्षात आल्यास त्याच्या विस्तारास टोमॅटो पट्ट्यातून अनेक बाजार

समित्या पुढे येतील. त्यामुळे या संशोधनाचे काम शक्य तेवढ्या लवकर सुरु व्हायला हवे.यासाठी शासनाने आर्थिक तरतूद करून प्रोत्साहन द्यायला हवे. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदीमुळे देशात शेतमाल विशेषतः फळे-भाजीपाला यांचे अपरिमित नुकसान झाले आहे.तांदूळ, गहू यांचे उत्पादन भरमसाठ झाल्याने आणि पाऊसमान चांगले झाल्याने अन्नधान्य तुटवडा जाणवला नाही. मात्र यानिमित्ताने काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. शेतमाल जास्त काळ टिकवण्यासाठीची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे याकडे यासाठीचे संशोधन वाढीस लागण्याची गरज आहे.  -मच्छिंद्र ऐनापुरे, जत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा