रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

सार्वजनिक गणेशोत्सव रद्दच करावा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवावर फारच मर्यादा आल्या आहेत.  शासनाने यंदाच्या गणेशोत्सवाबाबत काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हा उत्सव साजरा होणे गरजेचे आहेच, मात्र प्राप्त परिस्थिती पाहता आणि अनेक क्षेत्रात उद्भवलेले आर्थिक  संकट पाहता सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करणेच हिताचे आहे. शिवाय घरगुती उत्सवालादेखील मर्यादा यायला हव्यात. आपण मार्च 2020 पासून अनेक सण, उत्सव ,यात्रा-जत्रा यांना फाटाच दिला आहे. गेल्या पाच-सहा महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. त्याची भीषणता वाढत चालली आहे, त्यामुळे यंदा गणेशोत्सव साजरा केलाच पाहिजे, असा अट्टाहास धरला जाऊ नये. खरे तर बदलत्या परिस्थितीनुसार वा अचानक काही अडचण निर्माण झाल्यास उत्सवाच्या स्वरूपात बदल करणे हिताचे ठरते. या पार्श्‍वभूमीवर प्रसिध्द पंचांगकर्ते तसंच खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी या संदर्भात मोलाचे विचार मांडले. त्यांनी सांगितले आहे की, 'यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु अडचणीमुळे एखाद्या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापना आणि पूजा करता आली नाही तर शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता त्याला दोष देता येत नाही. मुख्यत्वे दर वर्षी गणेश चतुर्थीला गणेशस्थापना आणि पूजा करायलाच हवी, असं कुठल्याही मान्यवर ग्रंथांमध्ये लिहिलेलं नाही. या वर्षी कोरोनामुळे विविध गणेश मंडळांनी हा उत्सव साधेपणाने साजरा करायचं ठरवलं आहे तर काही मंडळांनी हा उत्सव रद्द केल्याचं जाहीर केलं आहे.ही चांगलीच गोष्ट आहे. मुंबईच्या प्रसिध्द लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने गणेशमूर्तीची स्थापना, उत्सव न करता या काळात आरोग्योत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. त्यामुळे इतर गणेश मंडळांनीही अशाच स्वरूपाचे निर्णय घेणं आजच्या कोरोनाच्या संकटकाळात योग्य ठरणार आहे.गणेश मंडळांनी आपापल्या परीने कोरोनावर नियंत्रण आणणाऱ्या उपाययोजनांवर काम करायला हवे किंवा यासाठी मदत करायला हवी. लोकमान्य टिळक यांचा गणेशोत्सव साजरा करण्यामागे वेगळा दृष्टिकोन होता. एकाद्या आपत्तीमुळे एकाद्या वर्षी सण साजरा केला नाही, म्हणून काही समस्या उदभवणार नाही. असे कुठल्या शास्त्रात म्हटले नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहून मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता चाललेल्या आरोग्य उपाययोजना करण्यासाठी यंत्रणेला साहाय्य करायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा