बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

प्रत्येकाने अवयावदानाचा संकल्प करायला हवा

एक व्यक्ती आठ लोकांना अवयवदान करू शकतो. त्यामुळे किमान आठ लोकांच्या जीवाचे रक्षण करणे शक्य आहे. मात्र, भारतात अवयवदानाचे प्रमाण हे प्रती दहा लाखांच्या मागे 0.८ टक्के एवढे अल्प आहे. जे अमेरिका आणि स्पेनसारख्या विकसित देशांच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यामुळे अवयवदानास प्रेरित करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम वाढवण्याची गरज आहे. आज एक मेंदूमृत व्यक्ती मरणोत्तर आठ लोकांना जीवदान देऊ शकतो. शिवाय टिश्य़ुच्या सहाय्याने किमान पन्नास रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल करून जीवन सुखकर करू शकतो. काही कारणांनी व्यक्तीचे अवयव निकामे झाल्यावर अत्याधुनिक प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ते अवयव बदलविता येतात व रुग्णाचे जीवनमान वाढविता येते. मात्र, त्यासाठी कुणीतरी रुग्णास अवयवदान केले पाहिजे. रुग्णास जीवित व्यक्ती अथवा मृत व्यक्ती अवयवदान करू शकते. सध्या जिवंत व्यक्तींद्वारे करण्यात येणारे अवयवदानाचा टक्का मोठा आहे. मात्र, त्यामुळे प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या फार कमी लोकांना अवयव मिळत आहेत. अशा वेळी मेंदूमृत अथवा मरणोत्तर अवयवदानाचा टक्का वाढला तर अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतील. दोन प्रकारे अवयवदान करता येते. पहिला म्हणजे लिव्हिंग डोनर ऑरगन डोनेशन. यामध्ये जीवंत व्यक्ती आपल्या आप्तस्वकीयास मूत्रपिंड, स्वादूपिंड, यकृत अशा अवयवांचे दान करू शकतो. हृदयविकाराने अथवा मेंदूमृत पावल्याने निधन झाल्यास मूत्रपिंड, यकृत, स्वादूपिंड, हृदय, फुफ्फुस, आतडे या अवयवांसह डोळय़ांच्या कॉर्निया, त्वचा, बोन मॅरो, हृदयाच्या झडपा, रक्तवाहिन्या यांचेही दान करता येते. जीवंत व्यक्तीस अवयवदान करावयाचे असल्यास किमान वयोर्मयादा ही १८ वर्षे आहे. मात्र, शारीरिक परिस्थितीवरून डॉक्टर व्यक्ती अवयवदानास पात्र आहे की नाही, हे ठरवितात. सोबतच रुग्णाला एचआयव्ही, हेपीटायटिस बी, मधूमेह, कर्करोग असे विकार नकोत. जगभरातील उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की, अगदी सत्तरी व ऐंशीच्या वयात अवयदान व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. मेंदूमृत व्यक्ती अथवा मरणोत्तर अवयवदान करण्यासाठी वयाची अट नाही. आपण जीवनकाळात अन्नदान, अर्थदान करीत असतोच. मात्र, अवयवदानाने आपण मृत्यूनंतरही दान करण्याचा हेतू साध्य होईल. त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प केलाच पाहिजे. अवयदान न केल्याने अनेक रुग्ण अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी वाट बघत आहे. अवयवदानाने त्यांना जीवनदान देऊ शकू. प्रत्येक मृत्यूमध्ये अवयवदानाचे संधी असू शकते. अपघात अथवा इस्पितळात मृत्यू झाला तर नातेवाईकांनी डॉक्टरांना अवयवदानाची संधी आहे का, यासंबंधी विचारण केली पाहिजे. जर अवयवदान करण्याची संधी असेल तर ते घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली 7038121012

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा