शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या

सध्या वर्षभर मुलांच्या कुठल्या ना कुठल्या परीक्षा सुरू असतात. म्हणूनच सणासमारंभांचे, खरेदीचे कार्यक्रम ठरवताना मुलांचे शेड्युल बिघडणार नाही, याकडे लक्ष पुरवावे. मुलांच्या आहाराकडेही काळजीपूर्वक लक्ष द्यावे. अगदी साधी असली तरी परीक्षा म्हटल्यावर मुलांना थोडा ताण आणि दबाव येतोच. त्याचबरोबर अभ्यासासाठी बैठक वाढवली असेल तर त्यासाठीही अधिक एनर्जी लागते. यासाठी मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.
मुलांनी नियमित दूध घेणो महत्त्वाचे ठरते. मुलांना दुधाबरोबर शतावरी कल्प द्यायला हरकत नाही. शतावरी कल्प स्त्रियांसाठी उपयुक्त असले तरी मुलांसाठी किंवा पुरुषांसाठीही हा आरोग्यदायी कल्प आहे. त्याचबरोबर मुलांना नियमितपणे च्यवनप्राश द्यावे. सिझनमध्ये बाजारातून एकदम आवळे आणून मोरावळा किंवा पाकवलेला आवळा बनवून ठेवावा. मुलांचा आहार ताजा, सकस, कमी तेलकट आणि कमी मसालेदार असण्याकडे लक्ष द्यावे. साध्या सकस आहारामुळे डोके शांत राहण्यास मदत होते. सणवार असले तरी मुलांच्या आहाराकडे दुर्लक्ष करू नये.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा