बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

वाढत्या प्रदूषणावर तोडगा काढा

आज मोठमोठ्या शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वात जास्त प्रदूषण वाहनांमधील धुरामुळे होत आहे.वाहनांमधून उत्सर्जित होणार्‍या घातक वायूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात याचे प्रमाण वाढले आहे. कुपोषणामुळे जसे शरीराच्या सर्व अवयवांवर दुष्परिणाम होतो. व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते आणि व्यक्तीचे शरीर सगळया रोगांना सहज बळी पडते. विविध प्रदूषणामुळे व्यक्तीच्या सगळया शरीर आणि मनावर मोठा परिणाम होत असतो. हा परिणाम स्पष्ट दिसत नाही तर कित्येक वर्षे हळूहळू होत असतो आणि त्याचे धोके खूप उशिरा लक्षात येतात. 
जल प्रदूषणाचा परिणाम थेट होतो तर वायू प्रदूषणाचा परिणाम हा हळूहळू होत जातो. वाहनांची संख्येवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहनांमधून बाहेर पडणार्‍या घातक वायूंवरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गाडीची नियमित तपासणी करून त्यात काही बिघाड नाही ना, याची वेळोवेळी खात्री करून घेणे आवश्यक आहे. युरोप, अमेरिकेत वायू प्रदूषणाबाबत नियम कठोर आहेत. गाड्या घेतानाच त्यात या सुधारीत गोष्टी अस्तित्वात असतात. काही ठरावीक वर्षानंतर जुन्या गाड्या भंगारात काढल्या जातात आणि त्या गाड्या चालवण्यावर बंदी घातली जाते. 
भारतात एकदा घेतलेली गाडी त्या गाडीची वैधता संपल्यानंतरही ती रस्त्यावर असते. याबाबत देशभरातील वाहतूक खात्याने त्या त्या महानगरांसाठी नियम बनवूनही त्यावर अंमलबजावणी केली जात नाही. पेट्रोलपेक्षा डिझेल जास्त जड असल्यामुळे त्याने प्रदूषण जास्त होते. अशा वेळी आज प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजीचा पर्याय उपलब्ध आहे. पैशाची बचत करण्यासाठी आज मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाचालक ही सीएनजीची टाकी लावून घेतात. त्याचबरोबर बेस्टच्या अनेक बस या सीएनजीवर चालतात. पण इतर सगळयाच थरातील व्यक्ती या आजही पेट्रोल आणि डिझेलची इंजिन असलेल्या गाड्या वापरतात. आज सीएनजी भरण्याचे पंपही अस्तित्वात आहेत. त्यामुळे वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजीचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा