रविवार, २२ मार्च, २०२०

पाणी वाचवा,देश वाचावा

पृथ्वीवरील मानवजातीच्या अतिरेकामुळे आज निसर्गाचे संपूर्ण संतुलन बिघडत चालले  आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांची मुख्य गरज पाणी आहे. कारण पाण्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. भारतासह अनेक देशांमध्ये उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण होते. आजही अनेक देश पिण्याच्या पाण्यासाठी झुंज देत आहे. कारण ही बाब सर्वांना माहित आहे की पाणीच जीवन आहे, त्यामुळे प्रत्येक देशाचे कर्तव्य बनते की पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे.

मानव जातीने पाण्याचा योग्य वापर केला नाही तर संपूर्ण जग पाण्याच्या बाबतीत विनाशाकडे जाऊ शकते. मानवजातीने स्वत:च्या स्वार्थासाठी निसर्गाची राखरांगोळी केली आहे. आज अनेक देशांतील जंगल संपदा नेस्तनाबूत करून कारखाने, शहरे मोठय़ा प्रमाणात उभारले आहेत. त्यामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात जंगलातील हिंसक प्राणी (वाघ, अस्वल, सिंह, कोल्हा, बिबट्या, विषारी साप) शहरात शिरकाव करतांना दिसतात. यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित हानी सुध्दा झाली आहे आणि होत आहे.जंगल तोडीमुळे जंगलातील छोटे-मोठे तलाव आटून गेले. त्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.  त्यामुळे आता संपूर्ण जगाने पाणी वाचविण्याचा संकल्प केला पाहिजे. पाणी वाचविण्याचा संकल्प सरकारनी व नागरिकांनी सुध्दा घ्यायला पाहिजे. पाण्याच्या संदर्भात देशवासीयांना येणारा काळ अत्यंत बिकट येणार आहे कारण पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्त्व जाण अशी परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे आज पाण्याचे महत्त्व लक्षात घेण्याची नितांत गरज आहे. २५ वर्षात भारतातील पाण्याची स्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे भाकीत आहे की २0४0 मध्ये भारतात प्यायला पाणी मिळणार नाही, अशी स्थिती येऊ शकते. संयुक्त राष्ट्राने जगातील पाण्याच्या परीस्थितीच्या अहवालामध्ये ही भीती वर्तविली आहे. जगात पुढे चालून पाण्याचे भीषण संकट येणार असून भारत या संकटाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वातावरणातील बदल आणि भौगोलिक परिस्थितीमुळे संपूर्ण दक्षिण आशियात ही परिस्थिती येणार असली तरी भारताच्या प्रचंड लोकसंख्येला याचा त्रास होणार आहे. नद्या, सरोवर, तलाव यामध्ये उपलब्ध असलेले पिण्याचे पाणी झपाट्याने प्रदुषित होत आहे. त्यामुळे कारखान्यांचे दूषित पाणी व सांडपाणी यांना पिण्याच्या पाण्यापासून कोसो दूर ठेवायला पाहिजे. पाण्याचा पुनर्वापर करणारे प्रकल्प उभे राहिले पाहिजेत. समुद्राचे खारट पाणी शुद्ध करणारे प्रकल्पही आता काठावरील राज्यांमध्ये उभे व्हायला हवेत. एका वर्षात पडलेले पावसाचे पाणी अडविता आले तर पाच वर्षे पुरेल एवढा पाणी साठा आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. परंतु त्यासाठी योग्य नियोजन करणे अजूनही आपल्याला जमलेले नाही. आताही उपलब्ध असलेले ८0 टक्के पाणी प्रदूषित आहे.त्यामुळे पाण्याच्या स्त्रोतांचे होणारे प्रदूषण आणि पाणी साठविण्यासाठी नसलेले नियोजन हे दोन प्रमुख प्रश्न आहेत. यावर दुर्लक्ष सुरूच राहील्यास येणार्‍या काही वर्षांत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे.
भारतात एक व्यक्ती सरासरी दररोज किमान ५0 लिटर पाणी वापरते, म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त वापर ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे आज पाण्याच्या नियोजनाची नितांत गरज आहे. त्याकरिता मोजून पाणी द्यावे, लहान बंधार्‍यांचे प्रमाण वाढवावे, नद्या व तलाव यात दूषित व सांडपाणी जाऊ नये याची दक्षता घ्यावी, शेतीची पध्दती आणि औष्णिक प्रकल्प हा काळजीचा विषय समजावा. मानवाने भूसंपत्तीचा अतिरेक केल्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची समस्या जटिल होत आहे आणि होणार आहे. त्यामुळे आताच सावधगिरीचे उपाय योजण्याची गरज आहे. कारण पाण्याची झळ जीव-जंतूपासून तर पशु-पक्षी व मानवापर्यंत सोसावी लागणार आहे. त्यामुळे मानवच पाणी वाचविण्याचा मार्ग काढू शकतो. पाणी संपले तर आपण संपू आपण संपलो तर जग संपेल त्यामुळे प्रत्येकाने पाणी वाचविण्याचा संकल्प केला पाहिजे, तेव्हाच पाणी वाचेल 'पाणी वाचवा देश वाचवा' हा निर्धार सर्वांनीच अंगिकारला पाहिजे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा