मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

सोशल मीडिया आणि किशोरवयीन मुलं

नुकतेच एक सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या किशोरवयीन मुलींना लवकर नैराश्य येत असल्याचे म्हटले आहे.हे प्रमाण मुलांच्या दुप्पट आहे. सोशल मीडिया आणि नैराश्याची लक्षणे यांच्यावर करण्यात आलेले हे पहिलेच संशोधन असून ई क्लिनिकल मेडिसिन या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे. लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधकांनी सुमारे ११ हजार तरुणांची माहिती यासाठी अभ्यासली. त्यामध्ये १४ वर्षांच्या मुली सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी दोन पंचमांश मुली रोज तीन तास सोशल मीडियावर घालवत असल्याचे समोर आले आहे, तर या वयाची एक पंचमांश मुले इतकाच वेळ सोशल मीडियावर घालवत असल्याचे समोर आले आहे.
केवळ एक टक्के मुलींनी सोशल मीडिया वापरत नसल्याचे सांगितले आहे, तर दहा टक्के मुलांनी सोशल मीडिया वापरत नसल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियाचा किमान उपयोग करणारे १२ टक्के तरुण, तर मोठय़ा प्रमाणावर वापर करणार्‍या ३८ टक्के तरुणांमध्ये गंभीर नैराश्याची लक्षणे आढळून आली आहेत. सोशल मीडियाचा वापर आणि नैराश्याची लक्षण यांच्यातील संबंध मुलींमध्ये अधिक ठळकपणे दिसून येतो. मोठय़ा प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करणार्‍या मुलींमध्ये टप्प्याटप्प्याने नैराश्याची लक्षणे वाढत असल्याचे दिसते, असे प्रा. य्वोन केली यांनी सांगितले. तरुणांमध्ये दिसणार्‍या नैराश्याचे मूळ कमी झोप, तसेच ऑनलाईन छळ यामध्ये असल्याचे दिसत असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे.  या मुळाशी असणार्‍या बाबींमागील कारणांचा शोध कुठेतरी आपला आपल्यापर्यंतच येऊन थांबतो. आपणच मोबाईलचा इतका जास्त वापर करतो आणि त्याचे दुष्परिणाम उद्भवले की त्या यंत्राला दोष देतो. ते एक संपर्काचे साधन आहे. जगाशी तुम्हाला जोडणारा, सांधणारा पूल आहे. पण, त्यावर किती गर्दी आपण करतोय, याचेच भानच आपल्याला राहात नाही. परिणामी तेथे उद्भवणार्‍या अपघातांना सामोरे जावे लागते.मग अपघात झाल्यानंतर फक्त पुलाला दोष देण्यापेक्षा आपण स्वयंशिस्तीने का वागलो नाही, याचा विचार केला पाहिजे. मुळात कोणत्याही गोष्टीच्या कितपत आहारी जायचे हे आपले आपणच ठरविले पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा