शनिवार, १८ जानेवारी, २०२०

वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ निर्माण व्हावी

निसर्ग आपल्याला नेहमी भरभरून  देत असतो. त्यात तो कसलीच कुचराई करत नाही. त्यामुळे आपण जीवन सुसह्यपणे चालले आहे. पण आपण आपला विकास साधत असताना या निसर्गावरच घाला घालत आहे. आपल्या पापामुळे वायू,ध्वनी,जल प्रदूषण भयानक वाढले आहे. याचा फटका शेवटी आपल्यालाच बसत आहे. म्हणजे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. आपल्याला वेळीच सावध व्हायला हवे आहे. वाढत्या आधुनिकीकरण व पाणी प्रदूषण व अन्य कारणांमुळे निसर्गाचा जो समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. त्याला पुन्हा वाटेवर आणण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे  बेसुमार जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे.
हे सर्व टाळण्यासाठी निसर्गाला आपला मित्र व गुरू मानून उपलब्ध वृक्षांचे जतन करणे. नवीन लागवड करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. निसर्गाचे व मानवाचे अतूट नाते आहे. निसर्ग आपला गुरू, मित्र व डॉक्टरसुद्धा आहे. वृक्षतोडीमुळे आपण अनेक औषधी वनस्पती नष्ट करत आहोत. निसर्गाचे जतन, पोषण आणि त्याची वृद्धी करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रदूषण, वृक्षतोड, वाढती लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग या सारख्या भयानक समस्या आपल्याला भेडसावत आहेत. त्यावर उपाय म्हणून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. प्रदूषण कमी करणे, वृक्षारोपण व त्याच्या संवर्धनाची चळवळ निर्माण व्हायला हवी, तरच पुढच्या पिढ्यांना एक सुंदर निसर्ग पाहावयास मिळेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा