बुधवार, १ जानेवारी, २०२०

ज्येष्ठ राजकारण्यांनाही रिटायर्ड करा


आपला देश तरुणांचा देश आहे. 2021 च्या जणगणनेनुसार देशातील तरुणांची संख्या 51 टक्के होईल, असे सांगितले जाते. 2011च्या जणगणनेनुसार तरुणांची संख्या 34 टक्के होती. इतर देशांच्या तुलनेत आपला देश सर्वाधिक तरुण आहे. चीनमध्ये 21 कोटी तर अमेरिकेत 7 कोटी तरुण आहेत. असे असतानाही आपल्या देशाची सूत्रे ही म्हातार्या राजकारण्यांच्या हातात आहेत. आपल्या देशात 50 ते 60 वयातल्या वृद्धांना तरुण म्हटले जाते. मग म्हातारे कुणाला म्हणायचे हा प्रश्नच आहे. सरकारी नोकरमान्यांना 58 ते 60 वय झाल्यावर सेवानिवृत्त केले जाते. का तर ते काम करण्यास लायक नसतात म्हणून. राजकारणात मात्र वृद्ध मंडळी खुर्चीला चिटकून असतात.या मंडळींना मात्र कसलेच बंधन नाही. खरे तर यांनाही रिटायर्ड करायला हवे. तरुणांच्या हातात सत्तेची, राजकारणाची सूत्रे द्यायला हवीत. ज्यांची संख्या मोठी आहे, त्यांना राजकारणात प्राधान्य द्यायला हवे.ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत, त्या वृद्ध राजकारण्यांना सत्तेची लालसा सुटतच नाही.
अगदी मानसिक आणि शारीरिकदृष्टीने थकलेले किंवा उत्साह चैतन्य नसलेल्या व्यक्तींनाही सत्तेचा मोह सुटत नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये ही ज्येष्ठ मंडळी पदाला चिकटून आहेत. सत्तेत मंत्रीपदाची धुराही यांच्याकडेच प्राधान्याने असते. वास्तविक, आपल्या देशातल्या तरुणांपुढे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. या लोकांना आपल्या हाताला रोजगार मिळावा, यासाठीचा विचार करण्याची संधी मिळायला हवी. त्यांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सामावून घ्यायला हवे. त्यांच्या प्रतिभेला, कौशल्याला संधी मिळायला हवी. यासाठी राजकारणात ज्येष्ठ मंडळींना बाजूला सारून तरुणांना संधी मिळाली पाहिजेज्येष्ठ राजकारण्यांना बाजूला सारण्यासाठी रितसर कायदा बनवण्याची गरज आहे. नोकरशहांना जसे रिटायर्ड होण्यासाठी वय निश्चित करण्यात आले आहे. तसे ज्येष्ठ राजकारण्यांसाठी वय निश्चित करायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा