सोमवार, २० जानेवारी, २०२०

महिलांच्या हाताला काम द्या

आपल्या देशात अजूनही शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योग क्षेत्रात महिला मागेच आहेत. वास्तविक महिला सर्व स्तरावर भक्कम असल्या तर संबंधित कुटुंब प्रगतीपथावर राहण्यास मदत होते. आपल्याकडे अजून ही 18 ते 30 वयोगटातील महिला मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्यातच महिलांना अडकवून सोडले आहे. नुकतेच दृष्टी स्त्री अध्ययन आणि प्रबोधन केंद्र या संस्थेमार्फत देशातील महिलांचे विविध पातळ्यांवर सर्व्हेक्षण करण्यात आले. यात निम्म्या महिला नोकरी, व्यवसाय न करणाऱ्या आहेत. प्रजनन क्षम वय, कौटुंबिक जबाबदाऱ्या अशी विविध कारणे आहेत. रोजंदारीवर जाणाऱ्या महिलांना पुरुषांपेक्षा कमी मजुरी मिळते.मात्र महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असतात.तरीही हा भेदभाव का, असा प्रश्न आहे.
महिलांना अर्धवेळ कामापेक्षा पूर्ण वेळ काम करायला आवडते,असे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. त्याच बरोबर 10 टक्के महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरे जावे लागते आहे. महत्त्वाचे म्हणजे महिला काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचे संतुलनाचे कौशल्य महिलांनी साध्य केले आहे. कुटुंबाची जबाबदारी त्या लीलया पार पाडत आहेत. महिलांना शिक्षण घ्यायचे आहे,पण लग्न,कौटुंबिक जबाबदारी, दळणवळण साधनांचा अभाव, आर्थिक परिस्थिती चांगली नसणे या कारणांमुळे महिलांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत आहे. दहावीनंतर बहुतांश महिलांनी शिक्षणाला ब्रेक दिल्याचे दिसते. त्यामुळे नोकरी, व्यवसाय करण्याची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी पुरेसे शिक्षण मिळत नाही. अभ्यासक्रम रुचीपूर्ण असायला हवा, असेही काही महिलांनी नोंदवले आहे. महिलांची बेरोजगारी हटवण्यासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्रे उभारली जायला हवी आहेत. प्रशिक्षण मोफत असायला हवे. कुटुंबात रमलेल्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण स्तरावर पाळणाघर, इतर सुविधा उपलब्ध व्हायला हवे. फळप्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांच्या बांधावर यायला हवेत. शहरातल्या झोपडपट्टीत कुटिरोद्योग सुरू व्हायला हवेत. म्हणजे महिलांच्या शिक्षणाच्या ऐपतीनुसार त्यांना उद्योग-व्यवसाय करायला सर्वच स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत. पुरुष मोठ्या प्रमाणात दारूत पैसा घालवतो आहे,याचा फटका अनेक कुटुंबांना बसत आहे. महिला रोजगार, व्यवसाय किंवा उद्योग करू लागल्या तर मिळणारा पैसा घरासाठी वापरला जाईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा