शनिवार, १८ जानेवारी, २०२०

वाढदिवसाला झाडे लावा

अलीकडच्या काही वर्षांत वाढदिवस साजरा करण्याचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र त्याला बीभत्सपणाही येत आहे. तरुण पिढी रस्त्यावर सुद्धा वाढदिवस साजरा करून सार्वजनिक शांतता भंग करत आहे. वास्तविक वाढदिवस साजरा कारणं काही वाईट गोष्ट नाही,पण तो साजरा करताना समाजाला काही उपयोग होईल का,हे पाहायला हवे. आपल्या आयुष्याचे एक वर्ष कमी झाले आहे. हे लक्षात ठेवून आपण समाजासाठी काही तरी करायला हवे,याचे भान यायला हवे. त्यामुळे आपला वाढदिवस एक उपक्रम घेऊन आला पाहिजे. वाढदिवस लक्षात ठेवायचा असेल तर या दिवशी प्रत्येकाने वृक्षारोपण करण्याचा चांगला पायंडा पाडायला हवा. निसर्गाचे तापमान वाढत आहे.'विनाश थांबवा, भूमातेचे तन मन जळते आहे.' या उक्तीनुसार वाढलेल्या तापमानाचा सामना करताना
सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रत्येक
वर्षी आपण या वर्षीसारखी उष्णता कधीच पाहिली नाही, असे मत व्यक्त करतो. मात्र मागील दहा वर्षांच्या तुलनेत या वर्षी झाडे कोठेच दिसत नाहीत, अशी प्रतिक्रिया आपण कधीच व्यक्त करीत नाही. केवळ प्रश्न उपस्थित करणे एवढेच आपले काम आहे का? पर्याय देणे व तो कृतीत आणण्यासाठी आपण पहिले पाऊल उचलणे, हेदेखील आपले कर्तव्यच आहे. आज जे सर्रास वाढदिवस किंवा अन्य कार्यक्रम साजरे होताना दिसतात, त्यात होणारा खर्च पाहिला तर कपाळाला हात लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. अर्थात, वाढदिवस साजरा करण्यास विरोध नसावा, करण्याचे कारणही नाही. पण या वाढदिवसाचे सार्थक करण्यासाठी काहीतरी विधायक कृती करणे गरजेचे वाटते. शक्यतो गावागावांत वाढदिनी किमान आठ ते बारा फूट वाढलेली रोपे लावावीत, जेणेकरून ती जगतील. या रोपांच्या वाढीकडेही लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या वाढदिनी झाडे लावून कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे ती जगविण्याचा निश्चय केला, तर तापमानवाढीवर नियंत्रण ठेवता येऊ शकेल. त्यामुळे वाढदिनी वायफळ खर्च करण्यापेक्षा झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा