शनिवार, ४ जानेवारी, २०२०

लोकसंख्येवर नियंत्रण आणा

1 जानेवारी 2020 या दिवशी आपल्या भारतात 67 हजार 385 मुलांनी जन्म घेतला. ज्या घरात बाळ जन्माला आले,त्या घरात आनंद,उत्साह ओसंडला असेल यात शंकाच नाही. पण देशाचा विचार केला तर मात्र मोठा काळजीचा प्रश्न आहे. ही संख्या सरासरी धरली तर आपल्या देशात वर्षाला 2 कोटी 45 लाख बाळे जन्माला येतात. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्ये इतकी आहे. एका वर्षाला अडीच कोटी मुलांचा जन्म ही काही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब नाही. उलट या नव्याने जन्माला आलेल्या मुलांसाठीच्या संसाधनांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आधीच आपल्या देशात संसाधने,अन्न यांची मोठी कमतरता आहे.
यात आता या नव्यांची भर. त्यांच्या गरजेचा विचार होणे आवश्यक आहे. आपल्या देशात बेकारी हा मोठा प्रश्न आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रोजगार घट चालला आहे.सरकारे रोजगार देण्याच्या बाता मारत असले तर त्यांच्या हातून काही घडताना दिसत नाही. आपल्याकडे महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देऊन अनावश्यक गोष्टींनाच हायलाइट केले जाते. त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न बाजूलाच राहत आहेत. आज लोकसंख्या नियंत्रणाबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही. वास्तविक लोकसंख्येवर नियंत्रण आणणे आपल्या देशाच्या हितासाठी महत्त्वाचे आहे,पण याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते आहे. 1 जानेवारीला आपल्या देशात सर्वाधिक बाळे जन्माला आली.चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. इतकेच नव्हे तर याबाबतीत चीन खूपच पिछाडीवर आहे. त्यांनी लोकसंख्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणले आहे. आपल्या देशातही लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा