बुधवार, २२ जानेवारी, २०२०

डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या

अलीकडे वेगवेगळ्या व्हटॅमिन्स, कॅल्शियमच्या गोळ्या बिनदिक्कतपणे घेणं सामान्य गोष्ट बनली आहे. किंबहुना, धावपळीमुळे थकवा जाणवतो, चाळीशीनंतर कॅल्शियमची कमतरता भासते. अशा ऐकीव माहितीवरुन काही लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च मेडिकलमधून गोळ्या आणतात आणि घ्यायला सुरुवात करतात; परंतु संपूर्ण माहितीशिवाय आणि किती आवश्यकता आहे हे न जाणता अशा गोळ्या घेणं लाभदायक ठरत नाही. किंबहुना, त्यांचे दुष्परिणामच दिसण्याची शक्यता असते.

अलीकडे आरोग्याबाबत समाजात अतीजागरुकता दिसून येते. ऐकीव माहितीवरुन किंवा विविध वर्तमानपत्र व पुस्तकातील माहितीवरुन काही जण स्वत:च समस्येवर उपचार करू लागतात. परंतु, प्रत्येकाची प्रकृती आणि समस्या भिन्न असतात. त्यासाठी चिकित्सा करुनच उपचार करण्याची गरज असते. एकच साचेबद्ध उपचार प्रत्येकाला फलदायी ठरू शकत नाही. सामान्य नागरिकांनी ही बाब जरुर लक्षात घ्यावी. साधारण दोन-तीन दशकांपूर्वी अशा गोळ्यांबद्दल फारशी माहिती नव्हती. आधीची पिढी अशा कुठल्याही उपचारांवर अवलंबून नव्हती. अलीकडे मात्र आरोग्य जागृतीची जणू लाटच आली आहे. वेळचे वेळी लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणं ही नक्कच चांगली बाब आहे. परंतु, उपचाराआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे तितकाच महत्त्वाचा आहे.
वास्तविक पाहता नैसर्गिक खाद्यपदार्थ जीवनसत्त्वं, क्षार, लोह आणि खनिजांनी परिपूर्ण असतात. त्यामध्ये सगळ्या प्रकारची घटकद्रव्यं असतात; मात्र रोजच्या आहारात सूक्ष्म पोषक तत्त्वांचं प्रमाण पुरेसं नसतं असा काहींचा गैरसमज असतो. तर काही जण मानतात की, पोषक द्रव्यं अधिक प्रमाणात घेतली तर अधिक लाभदायी ठरतील. परंतु, हा समज चुकीचा आहे. प्रत्येकासाठी व्यक्तीगत स्तरावर पोषक तत्त्वांची आवश्यकता ठरवणं अवघड असतं. सर्वसामान्यपणे पोषक तत्त्वांची जी सरासरी मात्रा निश्‍चित केली आहे त्यामध्ये अन्नपदार्थ शिजवताना पोषकद्रव्यांचा काही प्रमाणात होणारा र्‍हास लक्षात घेतला आहे आणि त्यानुसारच भोजनात कोणत्या पदार्थांची आवश्यकता किती असावी हे निश्‍चित केलं आहे. काही कंपन्यांच्या औषधांमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते. ती औषधे घेतल्याने  उलटा त्रास व्हायला लागतो. याचा परिणाम गंभीर स्वरूपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यायला हवीत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा