बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

पाणी बचत मंत्राचा प्रसार व्हायला हवा


पाणी म्हणजे जीवन. अशा पाण्याचा प्रश्‍न यंदा गंभीर आहे, याची जाणीव  ठेवायला हवी. दुष्काळसदृश परिस्थितीचं भान  ठेवायला हवं. त्याचप्रमाणे पाणीटंचाईच्या काळात पाण्याची उधळपट्टी ही गंभीर बाब आहे. पाण्याचा वापर काटकसरीनेच करण्याची आवश्‍यकता आहे. 
आम्ही पाणीपट्टी भरतो, मग किती पाणी वापरायचे हे  आम्ही ठरवणारअसे यापुढील काळात म्हणून चालणार नाही. पाण्याची बचत ही प्राथमिकता आहे. तज्ज्ञांच्या मते दरडोई दर दिवशी 40 लिटर पाणी पुरेसे ठरते. आपण किती पाणी वापरतो हे पाहणे गरजेचे आहे. वैयक्तिक, परिसराची व सार्वजनिक स्वच्छता कटाक्षाने पाळायला हवी. पण पाण्याची उधळपट्टी टाळायलाच हवी.  

आरोग्य सेवेबाबत महाराष्ट्र पिछाडीवर


महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हटले जात असले तरी आरोग्य व आरोग्यसेवा या बाबत महाराष्ट्र पिछाडीवर राहिले आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागत असला तरी आरोग्य सेवेच्या निर्देशांकामध्ये महाराष्ट्र मागे पडला आहे. सार्वजनिक सेवांचा र्हास झाल्यामुळे गरिबांनाही खासगी सेवेवर अधिकाधिक अवलंबून राहावे लागत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा हा एकूण आरोग्य सेवेचा कणा आहे. यामुळे यात आमूलाग्र सुधारणा होणे महत्त्वाचे आहे. याशिवाय, आरोग्यावरील सरकारी खर्चात व सरकारी सेवेत वाढ, पुरेसे व सक्षम मनुष्यबळ विकसित करणे, औषधांची खरेदी व आरोग्य केंद्रांना पुरवठा होणे, ’आशा-कार्यक्रमात सुधारणा, ग्रामीण उपकेंद्रांच्या दर्जात वाढ, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य अधिकार्याची नेमणूक करणे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये यांचे सक्षमीकरण करणे या सोबतच खासगी सेवेचे नियमन व प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे.

शिक्षण विभागासाठी स्वतंत्र सीईओ


विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व शिक्षणासंबंधी प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी  जिल्हा परिषदेला स्वतंत्र आयएएसदर्जाच्या पदाची आवश्यकता आहेप्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय विभागातील प्रशासकीय कामकाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात भारतीय प्रशासन सेवेतील मुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाचा स्वतंत्र पद    असायला हवे आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या वेतनावर सातशे ते आठशे कोटी रुपये वेतनावर खर्च होतात; विद्यार्थी व भौतिक सुविधांवरही कोट्यवधी रुपये खर्च होतातपरंतु  अपेक्षित गुणवत्ता विद्यार्थ्यांना मिळत नाही, याकडे समाजही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय कामकाज सुधारण्यासाठी आयएएस दर्जाचे पद निर्माण केल्यास बदल निश्चित घडेल, असे वाटते.

अवयवदानाबाबत जनजागृती व्हायला हवी


रक्तदानाबरोबरच अवयवदानही महत्त्वाचे आहे. आपल्या देशात एकूण लोकसंख्येपैकी फक्त 0.08 टक्का अवयव दान होते. हेच प्रमाण पाश्चात्य देशांमध्ये 10 ते 20 टक्क्यांपर्यंत आहे. दिल्ले येथील ऑल इंडिया मेडिकल सायन्स (एम्स) रुग्णालयात 3 ऑगस्ट 1994 रोजी देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण झाले. तेव्हापासून आधुनिक वैद्यकशास्त्राने हृदय प्रत्यारोपणाचा प्रयोग यशस्वी करण्याचा ध्यास घेतला. चेन्नई येथे 1995 मध्ये दुसरा हृदय प्रत्यारोपणाचा प्रयत्न झाला. त्यामुळे भारतातदेखील हृदय प्रत्यारोपणासाठी अत्यावश्यक पायाभूत सुविधा, कुशल शल्यचिकित्सक उपलब्ध असल्याचे जगाने मान्य केले. आतापर्यंत 21 हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रकिया झाल्या आहेत. मागणीपेक्षा पुरवठा फारच कमी आहे. त्यामुळे हृदय शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण प्रतिक्षेत आहेत.

गाय खरेदी करताना...


शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय फायदेशीर आहे. त्यामुळे गाय खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी. गाय खरेदी करताना त्याची जात व दुधाचा निकष घ्यायला हवा. दुधाचे सर्वाधिक उत्पादन पहिल्या पाच वेतांत मिळते. त्यामुळे पहिल्या किंवा दुसर्या वेताची गाय खरेदी करावी. याशिवाय दुभत्या जनावरांचे संगोपन व्यवस्थित व्हायला हवे. त्यासाठी चारा व खुराकाचा योग्य समन्वय हवा. जनावराच्या वजनाच्या दोन ते तीन टक्के कोरडा चारा त्यांना द्यावा. मका, गवत व कडबा यांची कुटी करुन चारा द्यावा. हिरव्या चार्याचे प्रमाण अधिक असायला हवे. जनावरांना दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी द्यावे. गोठा हवेशीर व स्वच्छ ठेवावा.

पेट्रोल पंपांवर मापात पाप


 वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरताना  मापात पाप कसे होते, त्याची जाहिरात प्रत्येक पेट्रोल पंपावर करण्याचा निर्णय वैधमापनशास्त्र विभागाने दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. हा निर्णय वाहनधारकांच्या हिताचा आहे.यातून त्यांची होणारी लूट थांबण्यास मदत होणार  आहे. मात्र भेसळ समजण्यासाठीचीही यंत्रणा पेट्रोल पंपांवर बसवणे आवश्यक आहे. ग्राहक जेवढे पैसे मोजतात, तेवढे पेट्रोल किंवा डिझेल वाहनधारकांच्या पदरात पडत नाही. याबाबतच्या तक्रारीचा मोठा भेंडोळा वैधमापनशास्त्र विभागाकडे सातत्याने पडत असतो. त्यानुसार काही ठिकाणी पेट्रोल पंपांच्या तपासणी होतात, पण तरीही काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल कमी मिळत असल्याच्या तक्रारी होतच असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल कमी का मिळते, यामागील ग्राहकांना कळावीत यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर जाहिरात लावण्याचा निर्णय घेतला गेला होता. या निर्णयाचे स्वागत होईल, मात्र त्याची अंलबजावणी करायला हवी.

तंत्रज्ञानाचा अतिरेक घातकच


विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर झाले आहे. त्यामुळे मानव उपयोगी नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी वैज्ञानिक झटत आहेत. मात्र दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे होणार्या दुष्परिणामावर नियंत्रण मिळविण्यासाठी समानांतर संशोधन करावे लागत आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच ठरतो, तसेच तंत्रज्ञान वापराचेही होत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना संवेदनशीलता बाळगण्याची वेळ आता आली आहे. गेल्या काही दशकापासून तंत्रज्ञानाचा कल्याणकारी उपयोग मागे पडत असून, दुष्परिणाम वाढले आहेत. काही विघातक मनोवृत्तीतून मानवसृष्टीला नष्ट करणारी अणुहत्यारे निर्माण केली जात आहेत.