बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

पेट्रोल पंपांवर मापात पाप


 वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरताना  मापात पाप कसे होते, त्याची जाहिरात प्रत्येक पेट्रोल पंपावर करण्याचा निर्णय वैधमापनशास्त्र विभागाने दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. हा निर्णय वाहनधारकांच्या हिताचा आहे.यातून त्यांची होणारी लूट थांबण्यास मदत होणार  आहे. मात्र भेसळ समजण्यासाठीचीही यंत्रणा पेट्रोल पंपांवर बसवणे आवश्यक आहे. ग्राहक जेवढे पैसे मोजतात, तेवढे पेट्रोल किंवा डिझेल वाहनधारकांच्या पदरात पडत नाही. याबाबतच्या तक्रारीचा मोठा भेंडोळा वैधमापनशास्त्र विभागाकडे सातत्याने पडत असतो. त्यानुसार काही ठिकाणी पेट्रोल पंपांच्या तपासणी होतात, पण तरीही काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल कमी मिळत असल्याच्या तक्रारी होतच असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल कमी का मिळते, यामागील ग्राहकांना कळावीत यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर जाहिरात लावण्याचा निर्णय घेतला गेला होता. या निर्णयाचे स्वागत होईल, मात्र त्याची अंलबजावणी करायला हवी.
पेट्रोल-डिझेलच्या भेसळीबाबतही निर्णय होणे आवश्यक आहे.भेसळ करणार्यांना मोठ्या शिक्षेक्षी तरतूद कायद्याने केली आहे. परंतु, दुर्दैवाने प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. भेसळ समजून येण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर तशी यंत्रणा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. अ नेक पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठा यंत्रणा जुन्या पद्धतीच्या आहेत.त्यामुळेही इंधन ग्राहकाला कमी मिळते. मात्र काही ठिकाणी पंप चालक फसवणूक करतात.त्याठिकाणी नव्या यंत्रणा बसवण्याची आवश्यकता आहे. पाच लिटरपेक्षा कमी पेट्रोल-डिझेल अचूकपणे मोजण्याबाबत समस्या आहेत. यासाठी नवी यंत्रणा असणे आवश्यक आहे. याशिवाय पेट्रोल-डिझेल पंपावर ग्राहकांच्या सोयी उपलब्ध असायला हव्यात. चाकात हवा भरणे, शुद्ध पाणी, शौचालये-स्वच्छतागृहे आदी सोयी मिळायला हव्यात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत(सांगली)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा