शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

काळजी घ्यायलाच हवी


अलीकडच्या काळात दैनंदिन जीवन असुरिक्षत बनले आहे. खोलवर विचार केला असता त्याला लोकांची बेजबाबदार वृत्ती कारणीभूत ठरते, हे लक्षात येईल. पती कामानिमित्त शहराबाहेर गेला असेल आणि एखादी स्त्री लहान मुलांबरोबर घरात एकटी असेल तर आजूबाजूच्या लोकांना याबद्दल माहिती देण्याची काहीच गरज नसते. मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी भर रस्त्यावर महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मोबाईलवर मोठमोठय़ाने बोलणे चुकीचे आहे. आपल्या बोलण्यातून अनोळखी माणसाला बरीच खासगी माहिती मिळते आणि या माहितीचा दुरूपयोग केला जाऊ शकतो. काही महिला आपापल्या गॅलरीतून दिवसभराच्या प्लॅनिंगविषयी बोलतात. आपण कुठे जाणार, कधी येणार याची चर्चा करतात. त्यामुळे चोराच्या हाती आयत्याच किल्ल्या मिळतात हे मात्र ते विसरतात.
त्यामुळेच अशा गोष्टींची जाहीर चर्चा करू नये. एटीएम कार्डचा उपयोग करताना पिनकोड लक्षात ठेवणे आवश्यक असते. परंतु, काही लोकांना एटीएम कार्डच्या कव्हरवरच नंबर लिहून ठेवण्याची सवय असते. अशाने अनोळखी माणसाला हा नंबर कळू शकतो. गर्दीच्या ठिकाणी किंवा रात्रीच्या वेळी पैसे आणि दागिने बाळगणे धोक्याचे आहे. आजकाल दारावर आलेले भिकारी किंवा सेल्समन चलाखीने स्त्रियांची फसवणूक करतात. त्यामुळे स्त्रियांनी प्रत्येक वेळी सतर्क राहणे गरजेचे आहे. पॉलिश करण्याच्या निमित्ताने एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या हाती मौल्यवान चीजवस्तू देणेही चुकीचे आहे. आपल्या मुलांनाही रफ अँण्ड टफ बनवण्याची आवश्यकता आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा