शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

शिक्षणपद्धती सुधारायला हवी


विदेशी शिक्षणपद्धतीचे आणि संस्कृतीचे सर्वांनाच आकर्षण आहे. त्यामुळे नकळत भारतीय शिक्षणपद्धती आणि परदेशी शिक्षणपद्धती यामध्ये तुलना केली जाते. तकडचे शिक्षण, राहणीमान, संस्कृती याबद्दल सर्वांनाच अप्रूप वाटते. आपल्याकडे काही वर्षे विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर एखादा विद्यार्थी वाणिज्य अथवा कला शाखेकडे वळला तर तो चर्चेचा विषय ठरतो. बाहेरच्या जगात मात्र शिक्षणाबरोबरच कार्यानुभवाला मोठा वाव आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी गेले असता मूळ शिक्षण आणि विशिष्ट क्षेत्रातील कामाची पद्धत यामध्ये बरीच तफावत असल्याचे जाणवते. अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असताना त्या क्षेत्रामधील कामाचाही अनुभव घेता येतो. आपण त्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित काम करू शकतो अशी खात्री पटल्यानंतरच पुढील शिक्षण घेतले जाते. भारतीय शिक्षण पद्धतीतही पुस्तक ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष कामाला आणि अनुभवाला महत्त्व द्यायला हवे. 
इतर देशांमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करणार्‍या व्यक्तीला समान आदर दिला जातो. कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते याचा प्रत्यय तेथील दैनंदिन जीवनात येतो. परदेशात शालेय शिक्षणातच कौशल्य विकासाचा समावेश असतो. मुलांना सुतारकाम, गवंडीकाम, बागकाम, शिवणकाम या सर्वांचं शिक्षण देण्यात येतं. यामुळे मुलांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडणं सोपे जाते. या पार्श्‍वभूमीवर भारतातही सर्व स्तरांवर हळूहळू सुधारणा होणे गरजेचे आहे. आता केवळ याची सुरुवात झाली आहे, असे म्हणावे लागेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा