शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रथमोपचार पेटयांची वानवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयांनी यासाठी अगोदरच हात वर केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या शाळांना प्रथमोपचार पेट्या उपलब्ध नाहीत. असे असूनही कोणीच याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ही दुर्दैवाची बाब म्हटली पाहिजे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना खेळताना अपघात झाल्यास वेळेत प्रथमोपचार मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळे  ग्रामीण रुग्णालये. ग्रामपंचायती किंवा  जिल्हा परिषदेने शाळांना प्रथमोपचार पेटी व साहित्य मोफत उपलब्ध करून दिले पाहिजे. शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत सर्व सरकारी, निमसरकारी व खासगी शाळांमधून विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी, मैदान, परिसराची स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा पुरविणे गरजेचे आहे. मात्र आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्रथमोपचार पेटी  दुर्लक्षित झाली आहे.
सध्याच्या घडीला सर्वच शाळांत  ही प्रथमोपचार पेटी उपलब्ध नाही. खेळताना किंवा दुसऱ्या एखाद्या प्रसंगात विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याला वेळेवर प्राथमिक उपचार मिळण्यासाठी शाळांमध्ये प्रथमोपचार पेटी उपलब्ध असणे आवश्यक आहे. जिथे आरोग्य केंद्रे आहेत तिथे, गावात व शहरात ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रांची सोय आहे तेथील शाळांत वेळेत उपचार मिळतात. परंतु
गावापासून लांब असलेल्या वाड्यावस्त्यांवरील दुर्गम भागातील शाळांत वेळेत उपचार मिळत नाही. त्यासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालये, ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगामार्फत किंवा जिल्हा परिषदांनी आपल्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून प्रथमोपचार पेटी
व साहित्य मोफत उपलब्ध करून द्यायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, नाशिक 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा