बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

हेल्मेटसक्ती योग्यच!


रोज छोटे मोठे अपघात होत असतात. खरे तर अपघात हा शब्द कानावर आला कि काळजात धस्स होतं.  लहान-मोठ्या अपघातांच्या घटना दररोज कानावर पडतात. त्या ऐकून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. कारण दुचाकीवरून कोणाचा मुलगा अथवा मुलगी, कोणाचा पती किंवा पत्नी नेहमीच प्रवास करतात. मात्र दुचाकीवरून ऐटीत रपेट मारणारा मुलगा-मुलगी अथवा आपण स्वत: हेल्मेट घालतो का, याचा विचार कोणीच करत नाही. किंबहुना बेपवाईच जास्त आढळते. दुचाकीस्वारांची उदासीनता ओळखून परिवहन विभागाने हेल्मेटबाबत पुढाकार घेतला आहे. नवी दुचाकी घेताना वाहनासोबत आता दर्जेदार हेल्मेट घेणेसुद्धा सक्तीचे होणार आहे. हेल्मेटशिवाय संबंधित वाहनाची नोंदणीच होणार नाही, असे परिवहन अधिकार्‍यांनी म्हटले आहे. हा निर्णय कदाचित अनेकांना रुचणार नाही. परंतु परिवहन विभागाचे हे पाऊल अत्यावश्यकच ठरते. दुचाकी खरेदी करतानाच प्रत्येक वाहनचालकाला दोन हेल्मेट द्यावेत, यासाठी केंद्र सरकारने आवश्यक आदेश काढावेत, असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच दिले.
दुचाकी अपघातात तरुणांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता ते योग्यच ठरतात. जेमतेम ५ टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरतात असा या पाहणीचा निष्कर्ष आहे.  हेल्मेट न वापरणे हा दंडात्मक गुन्हा आहे.  पण अंमलबजावणी करणारेही चिरीमिरी साठी  दुर्लक्ष करतात. गाडीवालेदेखील उदार होताना दिसतात. गेल्यावर्षी देशात ७५ हजार लोकांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात दुचाकीस्वार तरुणांची संख्या मोठी आहे. हेल्मेट वापराबद्दल सरकारी पातळीवर प्रबोधन केले जाते. परंतु त्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे जिवाला घातक असते. म्हणून कायदेशीर सक्तीपेक्षा स्वयंस्फूर्तीने हेल्मेट वापर सुरू झाला तर कितीतरी जीव वाचू शकतील.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा