बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

मुलांनो, मैदानात खेळायला जा


 मुलांचा खेळ थांबला आहे. शाळांमध्ये क्रीडांगण नाही.घराभोवतीही तीच अवस्था. त्यामुळे मुलांचा खेळ पुर्ण थांबला आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला आहे. मानसिकतेवर झाला आहे. देश, समाज घडविणारी पिढी अशी दुबळी राहिली तर देशाचे कल्याणच आहे.  म्हणून  मुलांनो, शाळा सुटल्यावर मोबाईल किंवा संगणकावर खेळण्यापेक्षा मैदानात खेळायला जा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शिवाय मुलांनी एवढ्यावरच थांबू नये तर  उत्तम आहार घ्या, असे म्हणायचीही वेळ आली आहे. उत्तम आहार घ्या व  हृदयरोग टाळा, मुलांनो, हृदयासारखं सुंदर मंदिर नाही. हसऱ्या चेहऱ्यांवर विश्‍वास ठेवण्यापेक्षा हसऱ्या हृदयावर विश्‍वास ठेवणं जास्त महत्वाचे आहे. अलीकडे हसरे हृदयच बघायला मिळत नाही. लहान मुलांनी आपल्या जीवनात उत्तम आहार घेतला आणि नियमित व्यायाम केला, तर कधीही हृदयाशी संबंधित आजार शिवणार नाहीत.
मुलांचे संगोपन उत्तम पद्धतीने व्हायला हवे, यासाठी पालकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सरकारचे हजारो कोटी रुपये आपल्या आरोग्यावर खर्च होतात. तुम्ही आरोग्याची नियमित काळजी घेतली, तर हा खर्च वाचेल आणि विकासकामांसाठी वापरता येईल.कॉम्प्युटर आणि मोबाईलमध्ये गेम्स खेळण्यापेक्षा मैदानात जाऊन खेळा, तरच आरोग्य उत्तम राहिल. उत्तम आहार घ्या, दररोज व्यायाम करा, जेवणात तेल, मीठ, साखरेचे प्रमाण कमी करा, जंक आणि पॅकेजड्‌ फूड खाणे टाळा, वरण-भात, भाजी आणि पोळी सर्वोत्तम आहार, नियमित सूर्यनमस्कार करा, शाळा सुटल्यावर मैदानात खेळायला जा. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा