मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

पदूषणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका

प्रदूषणाच्या बाबतीत ज्या पद्धतीने विचार व्हायला हवा,त्या पद्धतीने होत नसल्याने जग मोठ्या नाशाच्या वाटेवर पोहचले आहे. लवकरच पृथ्वीचा नाश अटळ असून लोकांना आता या प्रदूषणाच्या विळख्याने 40 टक्के ग्रासले आहे. 'प्रदूषण' ही जगासमोर मोठी आणि गंभीर समस्या म्हणून उभी ठाकली असली तरी सतत होत असलेल्या संशोधनाकडे मात्र पाठ फिरवली जात आहे. जल, वायू अथवा ध्वनिप्रदूषण असो. अशा प्रदूषित वातावरणात राहिल्यास मानवी मनावर आणि शरीवर गंभीर परिणाम होत असल्याचे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे.
अमेरिकेतील 'युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो'मध्ये वायू प्रदूषणासंबंधी नुकतेच एक संशोधन करण्यात आले. यामध्ये असे आढळून आले जे लोक दीर्घकाळापर्यंत प्रदूषित हवेत राहतात त्यांना 'बायपोलर डिसऑर्डर' अथवा नैराश्यसारख्या मानसिक समस्यांचा धोका वाढतो. बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त असलेल्या लोकांचे मन वेगाने बदलत असते. ते कधी आनंदात असतात तर कधी अतिउत्साहीत होऊन नैराश्याच्या गर्तेत सापडतात.  कॅनडा आणि अमेरिकेत हे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये असे आढळून आले की, जीवनाच्या सुरुवातींच्या वर्षात प्रदूषित भागात राहणार्‍या लोकांना मानसिक आजार होण्याचा धोका जास्त असतो. स्वच्छ हवेत राहणार्‍या लोकांच्या तुलनेत सर्वात प्रदूषित हवेत राहणार्‍या लोकांमध्ये बायपोलर डिसऑर्डर होण्याचा धोका २७ टक्क्यांनी जास्त असल्याचे या संशोधनातून निष्पन्न झाले.
वायू प्रदूषणाबरोबरच आता जलप्रदूषणही घातक बनू लागले आहे. कारण दूषित पाणी पिल्याने मानवी शरीर अनेक आजारांचे आगर बनत आहे. यामुळे स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि कमी आवाज ही जगभरातील तमाम लोकांची पहिली गरज बनू लागली आहे.याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.- मच्छिंद्र ऐनापुरे, सांगली 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा