बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

महापुराच्या नुकसानीतून धडा

राज्यात महापुराच्या तडाख्यातून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. 2005 हा नंतर हा सर्वात मोठा धोका आहे.  आपल्या श्रमाच्या कमाईतून पैसा शिल्लक पाडून घरे बांधून त्यात भविष्याची सुखमय स्वप्ने उराशी बाळगून जगणार्‍यांवर नियतीने घाला घातला. शेतकर्‍यांच्या पिकाची हानी तर झालीच. परंतु तेथील जनजीवन सुरळीत करण्यासाठी सरकारी यंत्रणेला बराच कालावधी लागेल. मात्र  सामान्य माणसांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होताना दिसतात.
त्याचे उत्तर कुणीच देत नाहीत. आपल्या देशाच्या विविध भागात अथवा सभोवताल माणसाच्या जीवनात आधी काय घडले आणि भविष्यात काय घडणार्‍याचे भविष्य सांगणार्‍या विद्वान ज्योतिष्याची मोठी संख्या आहे. ते मान्यवर हात पाहून त्यावरील रेषेवरून माणसांचे भविष्य सांगत असतात. त्याचबरोबर जीवनात भविष्यात विपरित घडणार्‍या घटनावर पायबंद घालण्यासाठीही उपाय सुचवून विघ्न हटवताना येते याचे सुद्धा ते सुतोवाच करीत असतात. प्रश्न असा पडतो की, भविष्य बघणार्‍या मान्यवर ज्योतिषांनी अशा भविष्यात उद्भवणार्‍या आपत्तीचे भविष्य आधीच सांगितले असते तर फार मोठी जीवित हानी तसेच वित्तहानी आपण टाळू शकतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आजकाल घर, मकान, बंगला, फ्ॅलट बांधण्यापूर्वी वास्तुशास्त्राचा वापर करून त्यानुसार बांधकामाला सुरुवात करतात याचा अर्थ असा की, आपल्या राहत्या घरात कधीच आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होणार नाही. तसेच घरात अन्न धान्याची विपुलता, सुखाचे आरोग्य, आनंदाचे वातावरण, प्रसन्नता आणि भरभराटी होण्यास्तव अशा कितीतरी शुभ प्रसंगासाठी वास्तू शास्त्रानुसार घरे बांधण्यात येतात. आता प्रश्न असा पडतो की, वास्तुशास्त्रानुसार बांधलेली घरे पाण्याखाली गेलीत कशी? त्यातील बरीचशी घरे वास्तुशास्त्रानुसार बांधलेली होती तरीही अशी आपत्ती कशी काय ओढवली? अशा प्रश्नांची उत्तरे कुणीच देऊ शकत नाही अथवा यापूर्वीही कुणी दिल्याचे ऐकिवात नाही कारण माणसाने आपल्या सोयीसुविधा करता आवश्यकतेनुसार निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न फारपूर्वीपासून सुरू केला असून त्याचे हळूहळू दुष्परिणाम आता जाणवायला लागले. माणसांच्या वसाहती सिमेंटच्या जंगलांनी व्यापल्या जात आहे. त्यासाठी वृक्षांची कत्तल फार मोठय़ा प्रमाणात करण्यात आली व सद्याही करीत आहेत. सिमेंटच्या वसाहती तसेच सिमेंटच्या रस्त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही तसेच ओढे, नाले, नद्याचे पात्र मानवी अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस अरुंद होत असून त्यामुळे पाणी सांभाळून घेण्यास नद्या असमर्थ करून पाणी प्रवाह सोडून इतरत्र पसरते. मानवी वसाहतीमुळे शेतजमीन कमी होत असल्याने शेतजमीनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी कमी होत आहे. विविध कारणाने माणसांनी निसर्गावर मात करण्याच प्रयत्न चालविल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून अवेळी पाऊस येऊन महापूर येणे हा त्यातीलच एक भाग आहे. साहजिकच आकस्मिक नैसर्गिक आपत्तीसाठी उद्भवणार्‍या अनेक प्रश्नांचे उत्तर हे सातत्याने ढासळणार्‍या पर्यावरणात मिळू शकते एवढे मात्र निश्‍चित.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा