शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

गावागावांमध्ये 'वाटर एटीएम' बसवा

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. राज्यात सुमारे चाळीस टक्के भागाला पुराने वेढले आहेत. तिथे पिण्याचा पाण्याचा मोठा जटील झाला आहे. तर दुसरीकडे कमी पावसामुळे दुष्काळी भाग तहानलेला आहे. या भागातल्या नागरिकांना अजून टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या पाणीपुरवठ्यातून रोजच्या वापरासाठी लोक पाणी वापरत आहेत. शिवाय टँकरने केलेला पाणी पुरवठा हा मोठ्या प्रमाणात अशुद्ध आहे. यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणात वाढले आहे. लोकांना नाईलाज म्हणून हे पाणी प्यावे लागत आहे आणि दवाखान्याची भरती करावी लागत आहे.
यामुळे लोक आर्थिक खाईत लोटले जात आहेत. महापूर भागातही पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मदत करणारे लोक अशा पूरग्रस्त लोकांना पिण्याच्या पाण्याचे शुद्ध जार, पाण्याच्या बाटल्या वाटत आहेत. अर्थात हा पुरवठा अपुराच पडत आहे. त्यामुळे लोकांना जे पाणी उपलब्ध होत आहे, त्याच पाण्यावर आपली तहान भागवावी लागणार आहे. साहजिकच आजारांना आयते निमंत्रण मिळत आहे. यावर खरे तर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने राज्यातल्या प्रत्येक गावात शुद्ध पाण्याचे 'वाटर एटीएम' बसवावे आणि त्याला कायमस्वरूपी पाण्याचा पुरवठा करावा. यासाठी नागरिकांकडून नाममात्र शुल्क आकरावे. नागरिक शुल्क देत असल्याने या पाण्याचा फक्त पिण्यासाठीच करतील.
वैद्यक शास्त्राच्या माहितीतून सर्वाधिक आजार हे पाण्यातून होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गावातल्या प्रत्येक नागरिकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत राहिल्यास आजारी पडण्याचे प्रमाण कमी होऊन यावर होणाऱ्या खर्चाला आळा बसेल. भारतातल्या नागरिकांच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खर्च होत असून यातून देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  सध्या देश आर्थिक आरिष्टयातून चालला आहे. देशातील अशा संकटांना आळा घालण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्याची गरज आहे. प्रत्येक गावात शुद्ध पाण्याचे वाटर एटीम बसवल्यास आजारांना तर आळा बसणार आहेच शिवाय त्यातून अनेक फायदे घेता येणार आहेत. या शुद्धीकरणातून वाया जाणाऱ्या पाण्यातून गावात झाडांचे संगोपन करता येईल. शुल्क आकारले जात असल्याने या यंत्रणेसाठी स्थानिक संस्थाना किंवा शासनाने आर्थिक झळ बसणार नाही. त्यामुळे गावागावांत 'वाटर एटीएम' बसवण्याची मागणी होत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली)  7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा