शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

खासगी वायरमनचा हस्तक्षेप टाळा'

पावसाळय़ात विविध कारणामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होतात. मात्र, अशाप्रसंगी वीजपुरवठा त्वरित सुरू करण्याच्या हेतूने ग्रामीण भागामध्ये गावातीलच अकुशल अशा खासगी वायरमनद्वारे दुरुस्तीचा प्रयत्न होत असतो. अशावेळी किरकोळ दुर्घटनांसोबतच प्रसंगी कायमस्वरूपी अपंगत्व किंवा प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे खासगी वायरमनचा हस्तक्षेप टाळून अपघात न होण्याच्या दृष्टीने वीजग्राहकांनी वीजयंत्रणेपासून सावध राहण्याची गरज आहे.

वादळी वारा आणि अतिवृष्टीमुळे वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडणे, विजेच्या तारा तुटणे, लोंबकाळणे, इन्सूलेटर फुटणे अशा विविध कारणामुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्नरत असतात. मात्र, काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याची सूचना वेळेवर न मिळणे किंवा यंत्रणेत बिघाड झाल्यास तो अवगत न होणे अशामुळे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. अशावेळी स्थानिक एखादा खासगी वायरमन वीजपुरवठा सुरू करण्याचा अनधिकृतपणे प्रयत्न करीत असतो. अपुरे ज्ञान अथवा निष्काळजीपणामुळे अपघाताच्या घटना घडतात. भारतीय विद्युत कायदा 2003 अन्वये असे कृत्य बेकायदेशीर असल्याचे जाहीरही करण्यात आले आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी वीजग्राहकांनी संबंधित भागातील लाईनमन, कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधावा. एका प्लगमध्ये अनेक पिना टाकण्याची सवय असते ते टाळावे. त्याचबरोबर शक्य असल्यास घरामध्ये एमसीबी सर्किट बसवून घ्यावे, जेणेकरून शॉर्टसर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप बंद होईल. अशाप्रकारे किमान काळजी घेतल्यास आपण विजेपासून होणार्‍या अपघातापासून बचाव करू शकतो.
महावितरणचा कर्मचारीही कधी-कधी फाजील अतिविश्‍वासामुळे आपले प्राण गमावून बसतात. सुरक्षा साधनांचा वापर करतच खंडित वीजपुरवठय़ाच्या तक्रारी सोडवाव्यात. मुख्यालयी राहून वीजग्राहकांना अखंडित सेवा द्यावी. कर्मचार्‍यांच्या अथवा अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे अपघाताच्या घटना घडल्याचे सिद्ध झाल्यास प्रशासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई प्रशासन विभाग करत असते. शिवाय वीज कर्मचार्‍यांनीही ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागावे, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, नेमका बिघाड काय आणि वीजपुरवठा सुरळित व्हायला संभाव्य कालावधीची माहिती ग्राहकाला द्यायला हव्यात,जेणेकरून वाद होण्याचे प्रकार होणार नाहीत.  वीज दिसत नसली तरी तिचे परिणाम मात्र जीवघेणे असतात. एक छोटीसी चूकही अखेरची ठरू शकत असल्याने विजेपासून सतर्कता बाळगायला हवी.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत (सांगली) 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा