शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

पर्यावरण रक्षण:नैतिक जबाबदारी

आधुनिकरण व विकासाच्या नावावर प्रकृतीशी केलेली छेडछाड. सिमेंटीकरणाचा हव्यास, पाण्याचे योग्यरित्या न केलेले नियोजन या सर्वांचा परिणामाने आज भीषण दुष्काळाचे विद्रुप धारण केले आहे. भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याचा वाणवा आहे. अनेक मोठ्या  शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढवलेली आहे. अलीकडच्या काही वर्षांत  अनेक शहराच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडत आहे. खरे तर ही आंतरराष्ट्रीय बातमी व्हावी अशी बाब आहे आणि म्हणूनच आज पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची नैतीक जबाबदारी ठरत आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. असे म्हणत संत तुकारामांनी आपल्या अभंगातून वृक्षांचे मानवाशी असलेले नाते सुंदर शब्दात वर्णन केले आहे.आपल्या संस्कृतीत वृक्ष, जंगल याला अनन्य साधारण महत्व आहे. मानवाच्या जीवनातील वृक्षांची गरज आणि महत्व याचाही वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही. कारण ज्या प्राणवायुशिवाय मानव एक क्षणही जगू शकणार नाही तो प्राणवायुच आपल्याला मिळतो. आपलं वनांबरोबर वेगळच सखोल नात आहे.परंतु दुर्दैवाने याचा सपशेल विसर पडला आहे.शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील वृक्षाच्या संरक्षण व संवर्धनासाठी दिलेले आज्ञापत्र आजही संयुक्तिक आहे. साधारण दीडशे वर्षापूर्वी ब्रिटीश राजवटीत औद्योगिकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे खुप मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली.समृध्द जंगले नष्ट झालीत व सिमेंटच्या जंगलाने पर्यावरणाचा र्‍हास झाला.शहराच्या सौंदर्यीकरणाकरिता कित्येक झाडांची कत्तल झालेली आहे.आजही चित्र फार भयानक आहे,वृक्षांची ती कत्तल आजतागायत सुरु आहे.याचा परिणाम संपुर्ण मानवी जीवनावर होतो आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या चळवळीत सामाजिक,राजकिय,धार्मिक संस्था तसेच अनेक कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी वृक्षारोपन करुन सहभाग नोंदीवला. परंतू खरी गरज आहे ती सातत्याची.लावलेल्या झाडाचे संगोपन व संवर्धनाची.मानवाने पर्यावरण पूरक काही चांगल्या सवयी लावून घेतल्या तर नक्कीच हरित क्रांती होईल व पर्यावरणाचा समतोल साधल्या जाईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, नाशिक 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा