शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

भारतीय अर्थव्यवस्था पिछाडीवर

अर्थव्यवस्थेच्या जागतिक क्रमवारीत अमेरिकेची अर्थव्यवस्था 20.49 ट्रिलियन डॉलर्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर 13.61 डॉलर्ससह चीनची अर्थव्यवस्था दुसऱ्या क्रमांकावर आहे. 4.97 ट्रिलियन डॉलर्स आकारमान असलेली जपानची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर जर्मनी 3.99 ट्रिलियन डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत ब्रिटन आणि फ्रान्सने भारताला सातव्या क्रमांकावर ढकलले. 2018 मध्ये ब्रिटनची अर्थव्यवस्था 2.64 ट्रिलियन डॉलर्सवरून 2.84 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली तर फ्रान्सची अर्थव्यवस्था 2.59 ट्रिलियन डॉलर्सवरून 2.78 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. जागतिक बॅंकेच्या 2018च्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावरून घसरून सातव्या क्रमांकावर आली आहे.
2017 च्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान 2.56 ट्रिलियन डॉलर्स होते. यामध्ये 2018 मध्ये अर्थव्यवस्थेच्या आकारमानात वाढ होऊन हा आकडा 2.73 ट्रिलियन डॉलर्स झाला. पण तरीही जागतिक क्रमवारीत मात्र भारताची घसरण झाली आहे. लोकसंख्येच्या आधारावर भारताच्या जीडीपीचा विचार केला तर दरडोई उत्पन्नात आणि गरिबीतून बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र, केंद्र सरकारसमोर गरिबीचे आव्हान कायम आहे.
सध्या सर्वच उद्योग क्षेत्रात मंदीची लाट आहे.उद्योगांच्या आकडेवारीनुसार, देशभरात प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये गेल्या 18 वर्षांतील सर्वांत मोठी घसरण झाली आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग मंदीच्या खाईत गेला आहे आणि याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला दिसून येत आहे.
भारतीय आर्थिक वाढीच्या दराची समस्या आहेच परंतु देशात रोजगारवाढ होतानाही दिसत नाही. भारत जागतिक महासत्ता होण्यासाठी केवळ आर्थिक वाढीचा दर पुरेसा नाही तर त्यासाठी देशातील गरिबी कमी करून रोजगाराच्या संधी वाढवाव्या लागतील. भारतीय रेल्वेने 63 हजार नोकऱ्यांसाठी जाहिरात काढली तर त्यासाठी 90 लाख लोकांनी अर्ज केले होते. मार्च 2019 मध्ये गत आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वाढीचा दर 6.8 टक्‍क्‍यांवर घसरला. हा दर गेल्या पाच वर्षांतील नीचांकी दर होता. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत वार्षिक वाढीचा दर 5.8 टक्‍के नोंदवला गेला. भारताचा तिमाही आर्थिक वाढीचा दर चीनपेक्षाही घसरण्याची घटना या दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच घडली. अमेरिका व चीन या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापारयुद्ध सुरू असून त्यामानाने भारत अजूनही मागे आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि रोजगार वाढीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा