मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

भेसळ माफियांना आवर घाला


दिवाळी हा आनंद आणि उत्साहाचा सण आहे. या महत्त्वाच्या भारतीय  सणाच्या पार्श्वभूमीवर फराळाच्या पदार्थांसह मिठाई, तेल दूध व दुग्धजन्य पदार्थ, पीठ, साखर,तूप यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते. आरोग्याला घातक असणारे घटक मिसळून नफा कमावणारी नवी माफिया जमात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. शहाराबरोबरच ग्रामीण भागातही हा माफियाराज बळावत चालला आहे. त्यामुळे या काळात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) लक्ष देण्याची गरज आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मिठाईसह तयार फराळाचे पदार्थ बाजारात येत आहेत. याशिवाय दिवाळीचा घरोघरी फराळाचे पदार्थ केले जात असल्याने या काळात तेल, दूध व दुग्धजन्य पदार्थ , पीठ, साखर, तूप यात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. याशिवाय बाजारात अत्यंत कमी दर्जाचे पदार्थ नागरिकांच्या माथी मारले जात आहेत. नागरिकांची फसवणूक होऊ नये आणि आरोग्य धोक्यात येऊ नये,यासाठी अन्न व औषध प्रशासनाने काळजी घेण्याची गरज आहे. दिवाळी हा आनंदाचा ,उत्साहाचा सण असून या काळात विकतचे दुखणे नागरिकांच्या मागे लागू नये,यासाठी विक्रेते यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची आहे.
दिवाळी सणात नवनवे कपडे, गोडधोड खाण्याचे पदार्थ आणि फटाक्यांची आतिषबाजी असते. आनंदाचा आणि उत्साहाचा सण असल्याने सर्वत्र खुशीचे वातावरण असते. मात्र अलिकडच्या काळात भेसळीचा प्रकार वाढला आहे. भेसळीबाबत कडक कायदे करण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी काटेकोर केली जात नसल्याने भेसळ करणाऱ्या लोकांचे फावते आहे. सणासुदीला तयार खाद्यपदार्थ आणि त्याच्या साहित्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत असते. याचाच फायदा काही व्यापारी आणि समाजकंटक घेत असतात. तेल,दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पीठ,साखर,तूप अशा खाद्य पदार्थात भेसळ करतात. यामुळे लोकांचे आरोग्य तर बिघडतेच पण मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूकही होत असते.
सणासुदीच्या काळात नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याची गरज असते. नागरिकांनी शक्यतो आयएसआय, एफपीओ असलेल्या वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य द्यायला हवे. हवाबंद पदार्थ घेताना पॅकिंग फुटलेले नाही. बुरशी आलेली नाही. एक्सपायरी डेट पुढे गेलेली नाही याची खातरजमा करून घ्यायला हवी. दुधापासून बनवलेले पदार्थ ,मिठाई ताजी नसेल आणि ती थंड ठिकाणी साठवलेली नसेल तर त्याचा वापर करू नये. सीलबंद पदार्थांवर त्याचे नाव, पत्ता, बॅच क्रमांक, पॅकिंग केल्याची तारीख, मुदत संपण्याची तारीख, शाकाहारी असल्यास हिरवा ठिपका, मांसाहारी असल्यास लाल ठिपका, अन्न पदार्थाचे वजन आणि किंमत त्याचबरोबर त्यातील घटक पदार्थ याचा तपशील पाहावा. असे न आढळल्यास प्रत्येकाने जागरूक नागरिक म्हणून नजीकच्या अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करायला हवी. आणि महत्त्वाचे म्हणजे खरेदीनंतर नागरिकांनी पक्क्या पार्वतीचा आग्रह धरावा.
वाढत्या भेसळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे अपंगत्व येऊ शकते. ड्रॉप्सी आजार संभवतो. धुण्याच्या सोडाच्या भेसळीमुळे आतांड्याला जखमा होऊ शकतात. मेटॅनिल यलो रंगाच्या वापराने कर्क रोग होऊ शकतो. खाण्याच्या रंगांच्या अति वापराने त्वचा रोग बळावतात. सर्वसाधारणपणे चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे मोनो सोडियम ग्लुटामेट म्हणजेच अजिनोमोटो हे सहा महिन्यांपेक्षा लहान मुलांसाठी प्रतिबाधित आहे. अतिसेवनाने रक्तदाब वाढू शकतो. दुधातील सोडा आणि युरिया यांच्या वापरामुळे आतड्यांचे विकार होऊ शकतात. त्यामुळे पदार्थ खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेणायची आवश्यकता आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा