बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

कृषीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांकडे वळावे

शेतीशी निगडीत विविध पूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांकडे शेतकर्‍यांनी आता वळणे गरजेचे आहे.कारण  याव्दारे शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पन्नाची हमी मिळू शकते.शेतीपुढील विविध आव्हानांमध्ये वातावरणातील बदल हा महत्वपूर्ण घटक असून विषम पर्जन्यमान हा त्याचाच परिणाम आहे. शेतीशी निगडीत सर्व संबंधित विभाग व घटकांनी समन्वयाने कामे केली पाहिजेत. शेतीशी निगडीत सर्व कृषी भागधारकांसाठी कार्यशाळांचे आयोजन केल्यास शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. कृषी अधिकार्‍यांसाठीच्या प्रशिक्षणाची आखणी करतांना शेतकरी व कृषी भागधारकांच्या अपेक्षा आणि गरजा जाणून घेणे नक्कीच महत्वपूर्ण आहे. प्रगतीशील शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतात केलेले नवनवीन प्रयोग अन्य शेतकर्‍यांपर्यत पोहचविल्यास ते अधिक प्रभावीपणे पोहचतील. यासाठी क्षेत्रभेटी व क्षेत्रप्रशिक्षण यावर भर दयावा. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध कृषी विषयक घटकांची सप्रयोग माहिती देणे उपयुक्त  ठरणार आहे. शेतकरी आणि विविध कृषी भागधारकांच्या अपेक्षा जाणून घेणे तसेच अधिकारी व प्रशासकीय यंत्रणा यांची त्याच्याशी सांगड घालणे गरजेचे आहे. दर्जा व गुणवत्ता वाढीवर लक्ष देण्यात येत असल्याने कृषीविषयक विविध प्रशिक्षणांमध्येही कालानुरुप बदल करावेच लागतील. कार्यशाळेतील सर्व घटकांच्या विचारांचे आदान-प्रदान प्रशिक्षण कार्यक्रमांचा दर्जा वाढविण्यासाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची संकल्पना साकारण्यासाठी नवनविन क्षेत्र शोधून ती शेतकर्‍यांपर्यत पोहोचवावी लागतील. शेतकर्‍यांनी आता केवळ पीक घेण्यापुरते मर्यादित न राहता प्रक्रिया उद्योगांकडे वळून कृषी-व्यापार क्षेत्रात पाय रोवण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा