शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

दिवाळी सुरक्षित साजरी करा


दिवाळीची लगबग सुरू झाली असून, सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे. दिवाळीचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. दिवाळीच्या आनंदात कुठलेही विघ्न नको. म्हणून, सुरक्षित दिवाळी साजरी करा. दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई आणि आतषबाजी यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारणही पुरेसे आहे. अशा घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नसल्याने अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी महत्त्वाची आहे.
दिवाळीच्या दिवशी फटाक्याने लागलेल्या आगीच्या घटना दरवर्षीच मोठय़ाप्रमाणात होत असतात. यात केवळ आर्थिकच नव्हे तर जीवित हानीही मोठय़ा प्रमाणात होत असते. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने, निष्काळजीपणा आणि उदासिनता यामुळे अशा घटना होत असतात. आपल्या व आपल्या कुटुंबीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सतर्कतेवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
दिवाळी आणि दिवे यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दिव्यांनी घराची सजावट करताना ती मोकळ्या जागेतच लावावीत. पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दुर आणि उंचीवर तसेच पंखे, वीजतारा यापासूनही ते दूर ठेवावेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा. तुटलेल्या वीज तारा वापरू नये किंवा जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने त्या सुरक्षित करून घ्यावेत. तुटलेले सॉकेट्स वापरू नये, घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत. फटाके उडविल्यानंतर त्याचा होणारा कचरा वीज यंत्रणेजवळ फेकू नका, त्या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. फटाके उडविताना मोकळ्या जागेतच उडवावित वीज तारांच्याजवळ फटाके उडवू नये. विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नये . विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये. रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात फटाक्यांचा कचरा वीज यंत्रणेजवळ फेकू नका.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा