रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

बाभूळ झाड वाचवा

ग्रामीण भागात कोरड्या, तसेच पाणथळ जागी हमखास आढळणारा वृक्ष म्हणजे बाभूळ. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उभे असलेले बाभळीचे झाड अनेक ठिकाणी पाहायला मिळायचे. मात्र, दिवसेंदिवस सरपणासाठी या झाडाची कत्तल होत असल्याने त्यांच्या संख्येत घट होत आहे. काही वर्षांपूर्वी बाभळीची वने आढळायची. ऐन उन्हाळ्यात हा जनावरांसाठी आणि माणसांसाठी हक्काचा निव-रा असायचा. बाभळीच्या शेंगा व पाला म्हणजे शेळ्या-मेंढ्यांचे आवडते खाद्य. त्यामुळे शेंगा खावू घालून मेंढपाळ झाडाच्या सावलीत विसावयाचे. उन्हाळ्यात उष्णतेमुळे झाडातून बाहेर पडणारा चिकट द्रव म्हणजे डिंक जमवायला अनेक मुले यायची. अनेक कुटुंबांची गुजरानही डिंक विकून व्हायची. त्यामुळे या झाडांना विशेष महत्त्व होते.
मात्र, दिवसेंदिवस सरपण, तसेच फर्निचरसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने, या झाडांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांनी उपजीविकेसाठी पर्यायी मार्ग शोधला असला, तरी औषधी डिंक मात्र हद्दपार होत चालला आहे. दिवसेंदिवस हॉटेल्स व उपहारगृहे यांची संख्या वाढत आहे. ढाब्यांवर वगैरे रोटी तयार करण्यासाठी जळण म्हणून लाकडाचीच आवश्यकता असते. कडक ज्वारी, बाजरीची भाकरी मागणी लोक करतात. त्यामुळे हॉटेलवाले रोटी, भाकरी लाकडाच्या जळणावरच करतात. यात बाभळीच्या झाडांचाही मोठ्या प्रमाणात कत्तली होत आहेत. मात्र, त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांचे हक्काचे खाद्य आणि त्याची सावली माणूस गमावून बसला आहे. झाडाची मुळे माती घट्ट पकडून ठेवतात. मात्र, वृक्षतोडीमुळे ग्रामीण भागात जमिनीची धूपदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. बाभळीचे झाड दिर्घायू असते. तसेच त्याचा घेरही मोठा असतो. सावली, डिंक, जनावरांचे खाद्य यादृष्टीने बाभळीचे महत्त्व आहे. बाभूळ ही काटेरी वनस्पती असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक पक्षी झाडावर घरटी बांधतात. पर्यावरणाच्यादृष्टीने बाभळीचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने या झाडांची तोड थांबवून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत
7038121012

1 टिप्पणी:

  1. *वृक्षवल्ली आम्हा सोयरे...*

    बाभळीचं झाड

    बाभूळ हा वृक्ष सर्वत्र कमी अधिक
    प्रमाणात आढळून येतो. या वृक्षाचा उपयोग इमारती लाकूड, जळण, जनावरांचे खाद्य, टॅनिन निर्मिती, औषधी म्हणून, लाख किडे वाढविण्यासाठी डिंक, धूप प्रतिबंधक, वारा प्रतिबंधक इत्यादी अनेक कारणांसाठी होतो. कमी पाण्यावर जास्त तापमानात तग धरून वाढत असल्याने दुष्काळी प्रदेशात या वृक्षाची लागवड केली जाते. प्रामुख्याने बाभूळ ही प्रजाती समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटर उंचीवर विविध प्रकारच्या समशीतोष्ण, उष्ण जंगलामध्ये आढळून येते. एक ते ४५ अंश से. तापमानात ही प्रजाती तग धरणारी आहे. २५० मिलीमीटर ते ३५०० मिलीमीटर पर्जन्यमानाच्या प्रदेशात ही प्रजाती आढळून येते. हा वृक्ष पर्णझडी जंगलात शुष्क व कोरड्या हवामानात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. आफ्रिका आणि भारतीय उपखंड उत्पत्ती स्थान असलेला बाभूळ हा वृक्ष दक्षिण आफ्रिका, आशिया खंडातील ब्रह्मदेश, भारत, श्रीलंका इत्यादी ठिकाणी नैसर्गिकरीत्या आढळून येतो. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, इराण, इराक, नेपाळ आदी देशांमध्ये आढळते.
    व्हिएतनाम आणि वेस्ट इंडिज या ठिकाणी या वृक्षाची लागवड केली जाते.बाभूळ वृक्षाला
    या शास्त्रीय भाषेत 'आकेशिया निलोटिका' या नावाने ओळखले जाते. वृक्षास इंग्रजीत 'बबूल', 'गम अरेबिक ट्री', 'सॅन्ट ट्री', 'प्रीकली आकेशिया', 'थ्रोनी मायमोसा' इत्यादी नावांनी ओळखले जाते. विविध उपयोग व गुणांमुळे संस्कृतमध्ये या प्रजातीस 'बबूल',
    'युंगलाश', 'कण्टालू, तीक्ष्णकण्टक, गोग, पंक्तिबीज,
    दीर्घकण्ट, कफान्तक, दृढबीज, अजभक्ष, बब्बूर, किंकिराट, पीतक, पीतपुष्पक, किंकिशत,
    युग्मकण्ट, सूक्ष्मपत्र, कीकर अनेक नावांनी ओळखले
    जाते.

    https://irwintimes.com/

    उत्तर द्याहटवा