शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

भाजप शिस्तीचा पक्ष राहिला नाही

भाजपमध्ये सध्या पक्षांतराचा महापूर आला आहे. मात्र यापूर्वी कार्यकर्त्यांची निवड ही काटेकोरपणे आणि सर्व बाबी तपासून केली जायची. परंतु, आता तसे होत नाही. भाजपमध्ये कोणाला घेताना त्याच्या सर्व बाबी तपासल्या जायच्या. पण आता फक्त खोगीर भरती सुरू आहे. याला पुष्ठी देणारी नुकतीच  एक बातमी आली आहे.  भाजप सदस्यांची संख्या १८ कोटींवर पोचली आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सध्या मिरवत आहे. एक जमाना असा होता, की चीन आणि रशियातील साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्ष हे जगातील सर्वात मोठे पक्ष गणले जात. अर्थात त्याचे कारण वेगळेच होते कारण त्या देशांत दुसर्‍या पक्षांना टिकूच दिले जात नव्हते. या पक्षांचे कोट्यवधी सदस्य होते. रशियात साम्यवादी कार्यकर्त्यांची संख्या दोन कोटी होती तर चीनमध्ये ही संख्या नऊ कोटी एवढी होती.
भारतापुरते बोलायचे झाले तर काँग्रेस हा भारताचाच नव्हे तर जगातील सर्वात मोठा आणि जुना पक्ष होता. मात्र आता तो केवळ जुना पक्ष राहिला आहे. मात्र आता भाजपने हा मान मिळवला आहे. भाजपची सदस्य संख्या इतके दिवस अकरा कोटी होती. गेल्या काही दिवसांत भाजपने राबवलेल्या सदस्य मोहिमेमुळे यात सात कोटींची भर पडली आणि ती अठरा कोटींवर गेली. सात कोटी लोक ही थोडी-थोडकी संख्या नाही. अनेक मोठय़ा देशांची लोकसंख्याही यापेक्षा कमी आहे. गंमत म्हणजे खुद्द भाजपला जी संख्या अपेक्षित होती त्यापेक्षा अडीचपट लोक पक्षात आले आहेत. हा पक्षात आलेला महापूरच म्हणायला हवा. भारत हा लोकशाही देश असल्यामुळे भारतीय लोकांना कोणत्या पक्षाचे सदस्य व्हावे, याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यासाठी शेकडो पक्षांचे पर्याय लोकांना उपलब्ध आहेत. तरीही भाजपमध्ये सदस्यांचा हा पूर का येत आहे? कारण त्या पक्षाकडे आज सत्ता आहे आणि सामान्य लोकांना याच पक्षात आपले भविष्य उज्‍जवल असल्याचे वाटत आहे.  भाजप देशासाठी काहीतरी करेल अशी आहे. राजकारण म्हणजे जत्रा आहे. इथे हौशा-गवशांचाही भरणा असतो. तसे भाजपचे झाले आहे. त्यामुळे भाजपने शिस्तीचा पक्ष हा मान गमावला आहे.   भाजप या पक्षात येणारे हे लोक पक्षाची विचारसरणी पसंत पडल्यामुळे किंवा पटल्यामुळे येत नाहीत. त्यामुळेच या वाढीव आकड्यामुळे हरखलेल्या नेत्यांना हे माहीत असायला हवे, की सत्ता जाताच ही गर्दी दुसरीकडे वळू शकते. त्यामुळे या कोट्यवधी नवीन कार्यकर्त्यांना कामाला लावणे हे पक्षापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा