रविवार, १ सप्टेंबर, २०१९

उत्सवाचा उद्देश सफल व्हावा


लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव जनजागृती करण्यासाठी सुरू केला. त्यामागे समाज प्रबोधन करण्याचा मुख्य हेतू होता. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्रपूर्व काळात जनजागृती, लोकसंघटन, लोकसंग्रह करण्यासाठी होता. स्वातंत्र चळवळीला बळ देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला. धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर लोकमान्य टिळकांनी जनतेला संघटित करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. परंतु, स्वातंत्र्यानंतर गणेशत्सवाचे रूपच पालटलेले दिसून येते. लोकप्रबोधनाचा मूळ उद्देश मागे पडला. वर्गणी जमवून फक्त देखावे करणे, दुसर्‍या मंडळाशी स्पर्धा करणे, मोठय़ा आवाजात डीजे लावून शांतता भंग करणे. गणेश विसर्जनाच्या वेळी महिलांची छेडछाड काढणे, असे प्रकार होत असताना दिसतात. रस्ते अरूंद असतानाही अनेक गणेश मंडळे विविध प्रकारचे देखावे करून नागरिकांना चालताही येऊ नये इतकी अडचण निर्माण करून फक्त स्वत:च्या हौसेपोटी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हे सुरू झाल्याचे दिसून येते. हे सर्व करत असताना लोकमान्य टिळक यांची आठवण, त्यांची मूल्ये, तत्वे याची जराही आठवण येत नाही.
ही बाब चिंताजनक ठरते. महापुराच्या भीषण संकटाच्या या पार्श्‍वभूमीवर प्रचंड खर्च करून देखावे करून गणेशोत्सव साजरा करायला हवा. वास्तविक गणेशोत्सवात बाजारपेठा, दुकाने भरलेली असतात. प्रत्येकजण गणेशाचे स्वागत आपापल्या कुवतीनुसार करत असतो. दहा दिवस सगळीकडे चैतन्य, उत्साह, पावित्र्याचे वातावरण असते. गौराईचे आगमन, पंचपक्वान्ने मग विसर्जन अशा उत्सवात गणेशभक्तीचे दर्शन घडते. गणेशोत्सव साजरा करावा. परंतु, यातून सामाजिक उपक्रम राबवून अडचणीतल्या लोकांना हातभार लावण्यासाठी गणेश मंडळांनी पावले उचलायला हवीत. अवाजवी खर्च करण्यापेक्षा तेच पैसे जर  विविध आपत्तीस सर्वच गमावलेल्या लोकांना मदतीच्या रूपात दिले तर गणपती नक्कीच पावेल. या आपत्कालीन स्थितीत हिंदू, मुस्लीमधर्म वगैरे कुठलाही विचार न करता लोकांच्या मदतीला धावायला हवे. उत्सव काळात राजकारण विसरून ऐक्य जपायला हवे. एकी, ऐक्य हाच संदेश लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवातून लोकांना दिला होता. लोक संकटातून पूर्ण बाहेर अजूनही पडले नाहीत. अजून स्थिरस्थावर झालेले नाहीत तर आपण त्यांना धीराचा हात देणे, सढळ हाताने मदत करणे आवश्यक आहे. गणेश सर्वांचाच लाडका बाप्पा. तो विघ्नहर्ता, सुखकर्ता आहे. याच गणेशाची कृपा भक्तांना संकटातून तारून नेत असते. या बुद्धीच्या देवतेने हीच सदबुद्धी द्यावी. पर्यावरण पूरक गणपती बसवून आता तरी विसर्जनाच्या वेळी पाणी दूषित करू नये. खूप मोठय़ा मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा होतो ही कल्पना चुकीची आहे. समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर भर द्यावा. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा