शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

शरीराकडे लक्ष द्या


आपल्या आयुष्यात तन आणि मन यांची एक निश्चित भूमिका आहे. नेहमी आपल्याला आपल्यात बदल हवा असतो. आपण बदलायला हवं, असं म्हणतो. तेव्हा आपण मनाचा विचार करतो. त्याची ताकद समजून घेतो. पण याच वेळेला आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपल्याला बदल हवा असतो, तेव्हा फक्त मनाची आवश्यकता असत नाही. यात आपल्या शरीराचाही मोठा हातभार असतो. एकदा विश्वनाथ आनंदला धावताना लोकांनी पाहिलं. लोकांनी विचार केला, अरे, बुद्धिबख खेळाडूला धावण्याची काय गरज आहे? हा तर बसून डोक्याने चालतो. झालं! लोकांनी त्याला गाठलंच! त्याने सांगायला सुरुवात केली, जर आपले शरीर ठीक नसेल, तर आपण ठीक विचारही करू शकणार नाही. आपण आपला डाव कसा खेळू शकणार? आपण आजारी असलो तर आपले विचार वेगळे असतात. आपल्या आजाराचा आपल्या मनावर प्रभाव पडतो. मनाला थकवा आलेला असतो. एक प्रकारची मरगळ आलेली असते. आणि आपण तंदरुस्त असतो तेव्हा विचार बिलकूल वेगळे असतात.
आपण शरीराला तंदुरुस्त ठेवल्याशिवाय मनाला खूश ठेवू शकत नाही. शरीर ज्यावेळेला उत्तम काम करतं, तेव्हा आपलं मन, डोकंही व्यवस्थित असतं. प्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट आणि मोटीवेटर डॉ. सियान बीलॉक सांगतात की, ज्यावेळेला आपण मनाच्या  बदलात शरीराच्या ताकदीचा विचार करतो, तेव्हा चांगले काम करू शकतो. आपण शरीराकडे लक्ष देतो, तेव्हा त्याची फार काळजी घेत असतो. लोक नेमाने पहाटे उठतात. आपल्या शरीराला पेलतं तसा व्यायाम करतात. खाण्यापिण्याकडे लक्ष देतात. व्यवस्थित झोप घेतात. साहजिकच त्याचा परिणाम मनावर होत असतो. त्यामुळे शरीराकडे लक्ष दिल्यास मनाचा फार विचार करावा लागत नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा